|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » क्रिडा » मनु अत्री-सुमित रेड्डी जोडीचा ऑलिम्पिक पदक विजेत्यांना धक्का

मनु अत्री-सुमित रेड्डी जोडीचा ऑलिम्पिक पदक विजेत्यांना धक्का 

जपान ओपन बॅडमिंटन : मलेशियन जोडीला केले पराभूत, महिला दुहेरीत अश्विनी-एन सिक्की जोडी स्पर्धेबाहेर

वृत्तसंस्था/ टोकियो

भारताची पुरुष दुहेरीची जोडी मनु अत्री-बी सुमित रेड्डी जोडीने जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी रिओ ऑलिम्पिक रौप्यजेत्या मलेशियाच्या गोह शेम-टॅन किओंग जोडीवर शानदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय जोडीने दुसऱया फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरीच्या अन्य लढतीत सात्विकराज-चिराग शेट्टी तर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन सिक्की रेड्डी जोडीला पराभवाचा सामना करावा लागला.

बुधवारी 700,000 अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत पुरुष दुहेरीतील सलामीच्या लढतीत मनु अत्री व बी सुमित रेड्डी जोडीने शानदार खेळाचे प्रदर्शन केले. 54 मिनिटे चाललेल्या या संघर्षमय लढतीत भारतीय जोडीने मलेशियाच्या गोह-टॅन किओंग जोडीचा 15-21, 23-21, 21-19 असा पराभव केला. आता, पुढील फेरीत मनु-सुमित जोडीसमोर चीनच्या ही जिंटिग-तॅन कियांग जोडीचे आव्हान असणार आहे. पहिला गेम गमावल्यानंतर भारतीय जोडीने दुसरा गेम जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली. यानंतर, तिसऱया व निर्णायक गेममध्ये भारतीय जोडीने शानदार खेळ करत हा गेम जिंकला व पुढील फेरीत प्रवेश केला.

पुरुष दुहेरीच्या अन्य लढतीत सात्विक-चिराग जेडीला जपानच्या तिसऱया मानांकित ताकेशी-केगो सोनोदा जोडीने 12-21, 17-21 असे नमवत पुढील फेरी गाठली. तसेच महिला दुहेरीच्या सलामीच्या लढतीतही पहिल्याच फेरीत भारताचे आव्हान संपले. भारताच्या अश्विनी पोनप्पा व एन सिक्की रेड्डी जोडीला कोरियाच्या चँग ये – क्यूंग एअुन जोडीने 21-17, 21-13 असे नमवत बाहेरचा रस्ता दाखवला.

आज, पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतसमोर दुसऱया फेरीत हाँगकाँगच्या वोंगचे तर प्रणॉयसमोर इंडोनेशियाच्या अँथनी गिंटिगचे आव्हान असणार आहे. महिला एकेरीत सिंधूची लढत चीनच्या गॅओ फँगजीशी होणार आहे.