|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजपने गाठले भ्रष्टाचाराचे शिखर

भाजपने गाठले भ्रष्टाचाराचे शिखर 

जनता हिंसक झाल्यास काँग्रेला जबाबदार धरु नये

प्रतिनिधी/ पणजी

भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन मागच्या निवडणुकीत काँग्रेसला खाली पाडणाऱयांनी आता भ्रष्टाचाराचे शिखर गाठले आहे. या भ्रष्टाचाराविरुद्ध लोक जागृत झाले असून झोपलेल्या व आय.सी.यू.त असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आतापर्यंत शांत असलेली जनता हिंसक झाल्यास काँग्रेस पक्षाला जबाबदार धरु नये, असा इशारा आझाद मैदानावर झालेल्या सभेत देण्यात आला.

काल बुधवारी कांपाल येथील दयानंद बांदोडकर मैदानावरुन सुरु झालेल्या भ्रष्टाचार विरोधी जागरला गोव्याच्या कानाकोपऱयातून लोक जमले होते. आझाद मैदानावर झालेल्या जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, आमदार प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, रवी नाईक, फिलीप नेरी रॉड्रिग्स, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, नीळकंठ हळर्णकर तसेच वरिष्ठ नेते रमाकांत खलप, फ्रान्सिस सार्दिन, प्रतिमा कुतिन्हो, उर्फान मुल्ला, एम. के. शेख, विजय भिके यांची भाषणे झाली.

तोपर्यंत काँग्रेस गप्प बसणार नाही

भ्रष्टाचाराविरुद्ध झिरो टॉलरन्स म्हणणारे भ्रष्टाचार कशा शिस्तबद्ध पद्धतीने करु लागले, याची उदाहरणे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली. लीज नूतनीकरणासंबंधी पोलिसांकडे तक्रार देऊनही त्याची दखल अजून घेण्यात आलेली नाही. या प्रकरणात गुंतलेल्यांना शिक्षा होईपर्यंत काँग्रेस पक्ष गप्प बसणार नसल्याचे ते म्हणाले.

… तर काँग्रेसला जबाबदार धरु नये

विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी आपल्या भाषणातून इशारा देताना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सहनशिलतेची परीक्षा सरकारने घेऊ नये, असे सांगितले. आतापर्यंत पाचवेळा राज्यपालांची भेट घेऊन निवेदने सादर करण्यात आली. शांततेने आणि लोकशाही पद्धतीनेच अजूनपर्यंत आंदोलन चालू आहे. यापुढे जनता भडकल्यास काँग्रेस पक्षाला जबाबदार धरु नये, असे ते म्हणाले.

न्यायालयाच्या इमारतीतही भ्रष्टाचार

सत्र न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम रखडून भाडय़ाच्या इमारतीत न्यायालय चालवले जाते. त्यात करोडो रुपयांचे भाडे वसूल केले जाते. त्यातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. स्मार्ट सिटीत गैरव्यवहार 1200 कोटी रुपयांचा असल्याचा आरोप त्यांनी केला. बहुजन समाजाला वेठीस धरुन त्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, असे त्यांनी सांगितले.

ओडीपीमध्ये कोटय़वधींचा भ्रष्टाचार : कामत

प्रतापसिंह राणे यांनी 100 किलो केटामाईन अमलीपदार्थ प्रकरणावर भाष्य केले व अजून आरोपी गजाआड का होत नाही, असा प्रश्न केला. दिगंबर कामत यांनी एसईझेड प्रकरण काढले. 129 कोटी बदल्यात सरकार 256 कोटी द्यायला पाहात आहे. यात भ्रष्टाचार असल्याचा आरोप त्यांनी केला. मडगावकरांनी विरोध केला म्हणून बाह्य विकास आराखडा थांबला पण पणजी, वास्को, कळंगूट व म्हापसा ओडीपीमध्ये करोडोचा भ्रष्टाचार असल्याचे ते म्हणाले.

भ्रष्टाचारासाठी पोर्तुगीजानांही मारल्या मिळय़ा : रवी

माजी मुख्यमंत्री रवी नाईक बोलत असताना जनरेटरमध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा बंद झाला. त्यामुळे सभा काहीवेळ खंडित झाली. या सभेला व्यत्यय आणण्यासाठी सरकारने जाणून बजून वीज पुरवठा बंद केल्याचा आरोप त्यांनी केला. पोर्तुगिजांना शिव्या देणारे अता 1600 कोटीचा भ्रष्टाचार करण्यासाठी पोर्तुगिजांसमोर लाचार होऊन त्यांना मिठय़ा मारत असल्याचे ते म्हणाले.

भ्रष्टाचार… काँग्रेसचा अन् भाजपचा

भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन काँग्रेस पक्षाला सत्तेवरुन खाली खेचले. काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार आणि भाजपचा भ्रष्टाचार यांच्यात फरक आहे. काँग्रेसवाला खाताना त्याच्या हातातून पडलेल्या शिंतोडय़ाने कीड मुंगीतरी समाधानी व्हायची, पण भाजपचा भ्रष्टाचार हावरटासारखा असून ते कोणालाच काही लागू देत नाहीत. पातेले चाटून खाताना त्याची कलईही खातात व केळे खाताना त्याची सालही सोडत नाहीत. दूध पिणाऱयाच्या मिशांना तरी दूध लागून तो सापडायचा पण मिशा ओल्या न होता दूध पिण्याचे कसब भाजपकडे असल्याचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सांगितले. काँग्रेस भाजपमधील भ्रष्टाचाराचा फरक सांगितला. जनतेकडून यापूर्वी काँग्रेसने विश्वास घालवला होता तो परत मिळविण्यासाठी आता हा जागर असल्याचे फिलीप नेरी यांनी सांगितले. रमाकांत खलप यांनी रात्र वैऱयाची असून सावध न राहिल्यास भाजप गोवा विकून खाईल, असा आरोप केला.