|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कामे न करणाऱया ग्रामपंचायती ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये

कामे न करणाऱया ग्रामपंचायती ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये 

जि. प. चा निर्णय : डॉक्टरांची रिक्त पदे न भरल्यास आरोग्य केंद्रांना टाळे ठोकण्याचा इशारा

जि. प. स्थायी समिती सभा

  • प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मेडिकल स्टोअरची सूचना
  • हत्ती हटावसाठी लवकरच मधुमक्षिका पेटय़ा देणार

 

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

 ग्रामपंचायतींना सक्षम बनविण्यासाठी विकासकामे देऊनही ती वेळेत केली जात नाहीत. त्यामुळे कामे प्रलंबित ठेवणाऱया ग्रामपंचायतींची ब्लॅकलिस्ट तयार करून अशा ग्रामपंचायतींना यापुढे कामे देण्यात येऊ नयेत, असा महत्वपूर्ण निर्णय जि. प. च्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची रिक्त पदे मोठय़ा प्रमाणात असल्याने आरोग्य सेवा कोलमडली आहे. ही रिक्त पदे शासनाने भरावीत अन्यथा आरोग्य केंद्रांना टाळे ठोकू, असा इशारा जि. प. उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिला.

 ही सभा अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै समिती सभागृहामध्ये झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, उपाध्यक्ष रणजित देसाई, विषय समिती सभापती सर्वश्री संतोष साटविलकर, प्रितेश राऊळ, सायली सावंत, गटनेते सतीश सावंत, सदस्य संजय पडते, राजेंद्र म्हापसेकर, संजना सावंत, अमरसेन सावंत, सुनील म्हापणकर, विष्णूदास कुबल, अंकुश जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरिष जगताप, सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, कमलाकर रणदिवे आदी उपस्थित होते.

गावचा विकास करण्यासाठी आणि ग्रामपंचायती आर्थिक सक्षम बनविण्यासाठी विविध विकासकामांची कामे ग्रामपंचायतींना दिली जातात. परंतु बहुतेक ग्रामपंचायती वेळेत कामेच करीत नाहीत. कामे अर्धवट ठेवली जातात आणि पुन्हा दुसरी कामे घेतली जातात, असा मुद्दा उपस्थित झाल्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यारंभ आदेश दिल्यापासून तीन महिन्यांत काम सुरू न केल्यास तसेच वेळेत काम न केल्यास ग्रामपंचायतीकडे एक काम असले तरी अशी अर्धवट कामे ठेवणाऱया ग्रामपंचायतींची ब्लॅकलिस्ट तयार करण्यात यावी आणि या ग्रामपंचायतींना यापुढे कामे देण्यात येऊ नयेत, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

आरोग्य केंद्रात मेडिकल स्टोअर

प्राथमिक आरोग्य केंदात जाणारे रुग्ण हे ग्रामीण भागातील असतात. त्यामुळे आरोग्य केंद्रात जाणाऱया रुग्णांना आरोग्य केंद्राबाहेरील औषधे घेण्याची वेळ येता नये. डॉक्टरांनी आरोग्य केंद्रातूनच औषधे द्यावीत, अशी सूचना मांडतानाच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकल स्टोअर सुरू करावा, अशी सूचना सतीश सावंत यांनी मांडली. जि. प. ने यावर योग्य विचार करून आरोग्य विभागामार्फत मेडिकल स्टोअर सुरू करण्याची योजना आरोग्य विभागाने तयार करावी, असे ठरविण्यात आले.

आरोग्य केंद्रांना टाळे ठोकणार

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सध्या मोठय़ा प्रमाणात डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. जे डॉक्टर आहेत, त्यांच्यावर कामाचा ताण वाढल्याने तेही सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे जिल्हय़ाची आरोग्य सेवा कोलमडली आहे. शासनाकडे वारंवार रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली. मात्र अद्याप रिक्त पदे भरलेली नाहीत. आता तर भात कापणीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरू शकतात. त्यासाठी डॉक्टरांनी पदे तात्काळ शासनाने भरावीत अन्यथा आरोग्य केंद्राना टाळे ठोकण्याचा असा इशारा रणजित देसाई यांनी दिला. तर जि. प. स्वनिधीतून डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यात यावीत. त्यांना मानधनही चांगले देण्यात यावे, यावर चर्चा करण्यात आली. डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचेही ठरविण्यात आले.

‘हत्ती हटाव’साठी मधुमक्षिका पेटय़ा

दोडामार्ग तालुक्यात हेवाळे गावात मधुमक्षिका पेटय़ा ठेवल्याने हत्ती पळून गेले. त्यामुळे हत्ती हटावसाठी चांगला मार्ग सापडला आहे. जि. प. ने ही यावर विचार करून मधुमक्षिका पेटय़ा पुरविण्याची योजना राबविण्याची सूचना म्हापसेकर यांनी मांडल्यावर जि. प. च्या कृषी विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल, असे उपाध्यक्ष देसाई यांनी स्पष्ट केले.

अनुकंप भरती बंद

आकृती बंद तयार होईपर्यंत शासनाने अनुकंपा तत्वावरील भरती बंद ठेवली आहे. सरळ सेवा भरती ज्यावेळी होईल, त्याचवेळी अनुकंपा भरती होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले. कुडाळ तालुक्यातील बंद झालेली अंधशाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षण खात्याची परवानगी न घेता लोकप्रतिनिधींच्या विरोधात उपोषण करणाऱया वैभववाडी येथील शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी सतीश सावंत यांनी केली, तर त्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले.

Related posts: