|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » शिरोडा, मांद्रे मतदारसंघांसाठी काँग्रेसची रणनिती निश्चित

शिरोडा, मांद्रे मतदारसंघांसाठी काँग्रेसची रणनिती निश्चित 

प्रतिनिधी/ पणजी

शिरोडा आणि मांदे या दोन मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रणनिती निश्चित केली असून प्रत्यक्ष मतदारसंघातील उपक्रमावर भर दिला आहे. काल रविवारी मांद्रे मतदारसंघात प्रचार कार्याला प्रारंभ केला तर शिरोडा मतदारसंघातही प्रचार कार्य सुरु केले आहे. पहिल्यांदाच भाजपला मागे टाकून काँग्रेसने पोटनिवडणूक जाहीर होण्याअगोदरच प्रचारकार्य सुरु केले आहे.

भाजप सध्या अंतर्गत राजकारणात गुरफटला आहे. पक्षाच्या नेत्यांमध्ये संघर्ष सुरु आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी थेट प्रदेशाध्यक्षानाच आव्हान दिले आहे. त्यामुळे सध्या भाजपात अंतर्गत कलह सुरु झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भाजपमधील अंतर्गत कलहाचा फायदा घेऊन थेट मतदार संघातच उडी घेतली आहे. भाजपमधील बंडाळीचा फायदा उठविण्यावर सध्या काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे. मांदे मतदारसंघातील बडांळी उफाळल्याने अगोदर मांद्रे मतदार संघात डेरा घालण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.

महादेव नाईक येताच शिरोडय़ाची रणनिती

शिरोडा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार फोडून त्यांना भाजपात आणले आहे. सुभाष शिरोडकर भाजपात दाखल झाले. सध्या भाजपचे माजी मंत्री शिरोडा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव नाईक गोव्याबाहेर आहेत. या आठवडय़ात ते गोव्यात परततील. महादेव नाईक गोव्यात येताच शिरोडा मतदासंघात बंडाळी सुरु होईल. काँग्रेस सध्या महादेव नाईक यांच्या परतण्याची वाट पहात आहे. नाईक हे गोव्यात परतताच त्यांचे कार्यकर्ते आपली भूमिका स्पष्ट करतील. त्यानंतर महादेव नाईक विरुद्ध भाजप असा नवा संघर्ष सुरु होईल. काँग्रेस पक्ष या संघर्षावर लक्ष ठेऊन आहे. शिरोडय़ात सुभाष शिरोडकर विरुद्ध महादेव नाईक असा संघर्ष सुरु झाल्यानंतर काँग्रेस आपली रणनिती निश्चित करणार आहे.

पहिल्यांदा काँग्रेस पक्ष आक्रमक

प्रत्येक निवडणुकीत किंवा पोट निवडणुकीत भाजपचे प्रचार कार्य अगोदर सुरु व्हायचे व उमेदवारी अगोदर निश्चित व्हायचे. मात्र यावेळी प्रथमच दोन मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी काँग्रेसने सहा महिने अगोदर प्रचार कार्य सुरु केले. भाजप या दोन्ही मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत तुर्त शांत आहे. काँग्रसने अद्याप उमेदवार घोषित केले नसले तरी प्रचार कार्य मात्र सुरु केले आहे. काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच एवढा आक्रमक बनला आहे.

दोन्ही फुटीराना घरचा रस्ता दाखवूः चोडणकर

मतदार संघातील मतदारांचा विश्वासघात करुन काँग्रेस पक्षाशी गद्दारी केलेल्या सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे या दोन्ही फुटीरांना मतदार घरचा रस्ता दाखवतील. मांद्रे व शिरोडा या दोन्ही मतदारसंघातील लोक स्वाभिमानी आहेत. मतदारसंघ आणि जनतेला वेठीस धरुन स्वार्थ साधण्यासाठी पक्षांतर केलेल्यांना मतदार त्याची जागा दाखवितील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

निवडून येऊन अवघ्या 18 महिन्यात आमदारांनी राजीनामा देण्यामागचे कारण मतदार या दोन्ही आमदारांना विचारणार आहेत. अवघ्या दोन वर्षात मतदारावर पोटनिवडणूक लादण्याचे कारणही शिरोडकर व सोपटे यांना द्यावे लागेल. विकावू आमदाराप्रमाणे मतदार विकावू नाहीत हे या पोटनिवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. मांद्रेतील मतदार स्वाभीमानी आहेत. व शिरोडय़ातील मतदार स्वतःचा स्वाभिमान बाळगून आहे. हे स्वाभिमानी मतदार या दोघानाही घरी पाठविल्यावाचून रहाणार नाही काँग्रेस पक्ष आज हेच आवाहन मतदारांना व लोकांना करणार आहे. या दोन्ही मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत मतदारांचा स्वाभिमान दिसून येईल असेही चोडणकर यांनी स्पष्ट केले. बेरोजगारी, महागाई, आर्थिक विवंचना, यामध्ये पाळून निघालेल्या जनतेचा विचार न करता भाजपने केवळ सत्तेचे आणि स्वार्थाचे राजकारण चालविले आहे. जनता याचा जाब या पक्षाला विचारल्यावाचून रहाणार नाही. लोक भाजप नेत्यांची वाट पहात आहेत. असेही चोडणकर यांनी सांगितले.

Related posts: