|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिक्षणाचा दीप अन् प्रकाशमान आयुष्य

शिक्षणाचा दीप अन् प्रकाशमान आयुष्य 

शिष्यवृत्तीवर घेतले उच्चशिक्षण : कोकण कृषी विद्यापीठात संचालकपदापर्यंत मजल

तेजस देसाई / दोडामार्ग:

शिक्षणासाठी 20 किमीचा पायी प्रवास… शिष्यवृत्तीवर एम. एस्सी. पर्यंत शिक्षण… पुढे पीएचडी… आणि हा खेडेगावातील एक विद्यार्थी ज्या कॉलेजमध्ये शिकला तिथेच प्राध्यापक आणि आता तेथील एका महत्वाच्या खात्याचा संचालक बनला. हा प्रवास वाचतांना कदाचित सहज दिसेल. परंतु तेवढा सोपा निश्चितच नव्हता. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ क्रीडा व सहशैक्षणिक उपक्रम या महत्वाच्या खात्याचे संचालक झालेले डॉ. प्रा. व्ही. जी. नाईक (उसप-दोडामार्ग) यांची ही गोष्ट. डॉ. नाईक आपल्या गावी आले असता त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधता आला.

सिंधुदुर्गातील मुळदे येथे सुमारे दीड हजार मुलांच्या सहभागाने होणारा ‘मयुरपंख’ कार्यक्रम नोव्हेंबरअखेर सुरू होत असून तो त्यांच्या पदभारानंतर पहिला कार्यक्रम ठरणार आहे. शिवाय एक-दोन नव्हे तब्बल 28 महाविद्यालयांची सहशालेय उपक्रमाची जबाबदारी उसपच्या या सुपुत्राकडे आली आहे. दापोलीच्या विद्यापीठात ते अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत. शैक्षणिक जीवनात आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती उंचावू पाहणाऱया विद्यार्थ्यांसाठी त्यांची वाटचाल प्रेरणादायी अशीच आहे.

दोडामार्ग तालुका हा तत्कालीन सावंतवाडी तालुका असेपर्यंत दुर्गम भाग होता. इथल्या सुमारे 58 गावांमध्ये वीज, पाणी, आरोग्य, दळण-वळण, शिक्षण सुविधा पोहोचल्या नव्हत्या. उसप गाव दोडामार्गपासून सुमारे दहा किमी अंतरावर आहे. इथे डॉक्टर व्ही. जी. नाईक लहानाचे मोठे झाले. इथल्या प्राथमिक शाळेत शिकले. पुढे गावातीलच बापूसाहेब देसाई विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण घेतले. घरची जमीन होती. ते शेती-भाती करायचे. धान्य होते पण धन नव्हते. आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे आपली परिस्थिती बदलण्याचे शिक्षण हेच माध्यम आहे, हे ओळखून व्ही. जी. नी अभ्यासावर भर दिला. खरंतर दहावी झाल्यावर गावापासून लांब असलेल्या कुडासे गावात सरस्वती विद्यामंदिर व विज्ञान महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचे ठरविले. उसप आणि कुडासे गावात सुमारे 20 किमी अंतर. मात्र, उसपमधून दळणवळणाच्या तशा सुविधा नव्हत्या. त्यामुळे कुडासे येथे पोहोचायचे असेल तर पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर काही दिवस पायी वारी केल्यावर तेथेच हॉस्टेलमध्ये राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आणि तेथून विज्ञान शाखेचे शिक्षण पूर्ण केले.

आईचा शिक्षणाचा आग्रह

व्ही. जी. यांच्यावर शैक्षणिक संस्कार होण्यामागे त्यांच्या आईची भूमिका महत्वाची. त्यावेळी चंगळवाद नव्हता. मात्र, शेतीतून जो फायदा शिल्लक राहायचा तो आपल्या शिक्षणासाठी राखून ठेवला जाई. शालेय शुल्क अथवा अन्य खर्चाची तजवीज व्यवस्थित करून ठेवली जाई. आईच्या शिक्षणाच्या आग्रहामुळे आज त्यांची परिस्थिती बदलली आहे.

सारे शिक्षण शिष्यवृत्तीवर

व्ही. जी. नी बालपणी कुटुंबाची आर्थिक ओढाताण पाहिली होती. आपण शिकत असताना कुटुंबाला हातभार लावणे शक्य होईल का, हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करायचा. मग शिष्यवृत्ती मिळवायचा त्यांनी प्रयत्न केला. महत्वाचे म्हणजे त्यांना बी. एस्सी. व पुढे एम. एस्सी. पर्यंत शिष्यवृत्ती मिळाली. ते तात्पुरत्या स्वरुपात प्राध्यापक असताना 850 रुपये पगार आणि 1000 रुपये फेलोशिप मिळायची. त्यामुळे खर्च भागायचा. पुढे ते दापोली कृषी विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्रोफेसर आणि आता प्रोफेसरबरोबरच संचालक आहेत. त्यामुळे आता त्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे. मात्र, खडतर परिस्थिती दूर करण्यासाठी शिक्षण महत्वाचे असल्याचे ते सांगतात.

मातृभाषेतूनच शिक्षणच महत्वाचे!

आज-काल इंग्रजी माध्यमाचे फॅड आहे. मात्र, हे चुकीचे आहे. मी मराठी माध्यमातून शिकलो. पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र, मला इंग्रजीची अडचण आली नाही. मान्य आहे की जागतिक भाषा आली पाहिजे. मात्र, दहावीनंतर विद्यान शाखा घेतल्यावर पुढे इंग्रजीतून शिक्षण असते. त्या वयात समजही वाढते व अभ्यास चांगला होतो. मीच नव्हे तर अन्य कित्येकांनी मराठी माध्यमातून शिकून पुढे इंग्रजीत अभ्यास केला. पण त्रास झाला नाही. माझ्या निरीक्षणानुसार इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेली मुले दहावी, बारावीच्या पायरीवर अडकतात. आपली संस्कृती व भविष्यात सक्षम पिढी घडविण्यासाठी मातृभाषेतूनच शिक्षणच महत्वाचे आहे. शिवाय मी दुसऱयांना उपदेश म्हणून सांगत नाही. तर मी माझ्या मुलाला मराठी माध्यमात शिकविले. तो बँकेत आज चांगल्या हुद्यावर आहे.

‘तो’ लेक्चर टर्निंग पॉईंट ठरला!

आपण अग्रीकल्चरला ऍडमिशन घेणे शक्मय नव्हते. तीदेखील शिक्षणाची शाखा असते हे माहिती नव्हते. मात्र, कुडासे येथे ज्युनिअर कॉलेजला त्यावेळी अकरावीत असताना तत्कालीन जिल्हा कृषी अधिकारी फाले लेक्चर देण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी दापोली येथील ऍग्रीकल्चर अभ्यासक्रमाची माहिती दिली. त्यामुळे आपण या शाखेकडे वळल्याचे व्ही. जी. म्हणाले.

28 महाविद्यालयांचे व्यवस्थापन

व्ही. जी. महाविद्यालयात असतांना उत्कृष्ट हॉलिबॉलपटू होते. पुढे दापोलीत गेल्यावर ते बॅडमिंटनकडे वळले. विद्यापीठात गेल्या 25 वर्षापासून ते बॅडमिंटन विभागाचे निवड प्रमुख आहेत. शिवाय दापोली तालुक्मयात बॅडमिंटनची पहिली संघटना स्थापन केली. त्याचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले. महत्वाचे म्हणजे त्यांचा ग्रुप आजही नियमित सकाळी बॅडमिंटन खेळण्यासाठी एकत्र येतो. आता व्ही. जी. कडे सहशालेयमध्ये तब्बल 28 महाविद्यालयांच्या मॅनेजमेंटची जबाबदारी कुलगुरुंनी दिली आहे.