|Sunday, August 25, 2019
You are here: Home » क्रिडा » मुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका

मुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नवोदित, युवा महिला बॉक्सर मनीषा मौनने महिलांच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आपल्यापेक्षा बऱयाच अंशी सरस व अनुभवी असलेल्या अमेरिकन ख्रिस्तियाना क्रूझला पराभवाचा जोरदार झटका दिला. या विजयासह तिने 54 किलोग्रॅम वजनगटातील उपउपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थानही निश्चित केले. 20 वर्षीय मनीषा मौन मूळ हरियाणाची असून यंदाची तिची ही पदार्पणाचीच विश्व चॅम्पियनशिप आहे.

वास्तविक, मनीषा मौनला 36 वर्षांच्या ख्रिस्तियानासमोर कडवे आव्हान होते. ख्रिस्तियाना बरीच अनुभवी असल्याने, शिवाय, विश्व चॅम्पियनशिपमधील दोन कांस्यपदकांचे पाठबळ असल्याने  अर्थातच तिचे पारडे जड होते. पण, ताज्या दमाच्या मनीषा मौनने कोणतेही दडपण न घेता सहजसुंदर, आक्रमक खेळ साकारला आणि ख्रिस्तियानाचे आव्हान संपुष्टात आणले.

मनीषाने यंदा इंडिया ओपन स्पर्धेत सुवर्ण तर पोलंडमध्ये संपन्न झालेल्या सिलेसियन महिलांच्या मुष्टियुद्ध चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकाची कमाई केली असून येथे तिने तिन्ही फेऱयांमध्ये जोरदार वर्चस्व गाजवले. पाच पंचांच्या पॅनेलने तिला 29-28, 30-27, 30-26, 30-26, 29-28 अशा फरकाने विजयी घोषित केले. रविवारी होणाऱया उपउपांत्यपूर्व लढतीत तिच्यासमोर आता कझाकस्तानच्या विद्यमान विश्वविजेत्या दिना झोलामनचे आव्हान असेल. मनीषाने यापूर्वी पोलंडमधील स्पर्धेत दिनाला मात दिली होती. त्यामुळे, ही तिची जमेची बाजू ठरु शकेल.

क्रूझविरुद्ध लढतीचे विश्लेषण करताना मनीषा म्हणाली, ‘माझ्या प्रशिक्षकांनी मला एक अंतर ठेवून आक्रमण करण्याचा सल्ला दिला होता आणि तो मी अंमलात आणला. क्रूझ उजव्या बाजूने अतिशय जोरदार आक्रमण करते, ते टाळण्याचा त्यांचा सल्ला होता. तो ही उपयुक्त ठरला. पहिल्या फेरीत मी फक्त तिचा खेळ आजमावत होते. काय करावे आणि काय करु नये, हे ठरवत होते. त्यानंतर दुसऱया फेरीत मी माझी रणनीती प्रत्यक्षात अंमलात आणत पंचेस लगावले आणि तिसऱया फेरीत सर्वोत्तम आक्रमण साकारत विजय खेचून आणला’.

अन्य एका लढतीत जपानच्या मुझुकी हिरुताला नमवत उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या दिना झोलामनने मनीषा मौन ही दर्जेदार मुष्टियोद्धा असल्याचे यावेळी नमूद केले. ‘पोलंडमध्ये तिने मला नमवले होते. पण, हारजीत प्रत्येक खेळाचा घटक असतो. पोलंडमध्ये जे झाले, ते इथे होणार नाही, याची मी काटेकोर काळजी घेईन’, अशा शब्दात तिने मनीषा मौनला इशारा दिला.