|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » ऑस्ट्रेलिया दौऱयात भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी करेल : माजी कर्णधार कपिल देव

ऑस्ट्रेलिया दौऱयात भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी करेल : माजी कर्णधार कपिल देव 

पुणे / प्रतिनिधी :

सध्याच्या परिस्थितीत भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. संघाकडे असलेली युवा खेळाडूंची टीम उत्कृष्ट खेळत असून, आगामी ऑस्ट्रेलिया दौऱयामध्येही खेळाडू आपला परफॉर्मन्स कायम ठेवत उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.

कृष्णपटनम पोर्टगोल्डन इगल्स गोल्फ चॅंपियनशिपच्या चौथ्या पर्वातील तिसऱया लीगला सुरुवात झाली असून, त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी वेस्टइंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा, कृष्णपटनमचे संचालक सी. शशीधर आदी उपस्थित होते. कपिल देव म्हणाले, भारतात गोल्फ मोठय़ा प्रमाणात लोकप्रिय होत आहे. योग्य वेळी तरुण, गुणवान गोल्फर्सना गोल्फिंगची आवड जोपासण्यासाठी पाठिंबा व उत्तेजन देणे गरजेचे आहे. आपल्या देशात खेळाला चालना देण्यासाठी प्रचंड पैसा, वेळ व प्रयत्न यांची आवश्यकता भासते आणि या खेळाप्रती कृष्णपटनम पोर्टने दाखवलेल्या पॅशनचे खरेच कौतुक करायला पाहिजे.

विंडीजला कामगिरी उंचावावी लागेल : लारा

लारा म्हणाला, सध्याच्या परिस्थितीत वेस्ट इंडिज संघाची कामगिरी खालावलेली आहे. या संघामध्ये सर्वच युवा खेळाडू असून, त्यांच्याकडून असलेली अपेक्षा पूर्ण होताना दिसून येत नाही. परंतु, आगामी सामन्यांमध्ये खेळाडूंना आपली कामगिरी उंचावावीच लागणार आहे. गेले काही दिवस मी गोल्फ खेळतो आहे. गोल्फ हा प्रेश करणारा आणि ताण दूर करणारा खेळ आहे. क्रिकेटच्या व्यतिरिक्त अन्य खेळ लोकप्रिय करण्याची व त्याच वेळी खेळाचा आनंद घेण्याची संधी मला या खेळामुळे मिळते आहे. चँपियनशिपमधील स्पर्धात्मकता व खेळाडूंची प्रेरणा खरेच उल्लेखनीय आहे. अशा स्पर्धांमुळे भारतात हळूहळू लोकप्रिय होत असलेल्या खेळाचा एक भाग बनण्याची संधी तरुण गोल्फर्सना मिळत असल्याने अशा स्पर्धा आणखी व्हायला हव्यात, अशी अपेक्षाही लाराने व्यक्त केली.