|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » केंद्रीय पथकाकडून दुष्काळाची पाहणी

केंद्रीय पथकाकडून दुष्काळाची पाहणी 

प्रतिनिधी /आटपाडी :

केंद्रीय पथकाने आटपाडी तालुक्यातील दुष्काळाची भयानकता पाहून शेतकऱयांशी अडचणी जाणून घेतल्या. पिण्याच्या पाण्याची समस्या, जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न, कोरडय़ा पडलेल्या विहिरी, जळालेली पिके, टँकरव्दारे जगविल्या जाणाऱया बागा, कामाअभावी सुरू असणारी भटकंती याबाबत विस्तृत आढावा घेत केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने लोकांशी संवाद साधला. पाणी नाही, चारा नाही, हाताला काम नाही, पीकविमा नाही. मग आम्ही जगायचे कसे? असा सवाल  करत शेतकऱयांनी आपली भावना मांडली.

भारतीय खाद्य निगमचे सह. संचालक सुभाषचंद्र मीना, सह. संचालक एम. जी. टेंभुर्णे, वरिष्ठ चारा विशेषतज्ञ विजय ठाकरे यांच्यासह विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, कृषि आयुक्त एस. प्रतापसिंह, महसूलचे उपायुक्त प्रताप जाधव यांचा समावेश असणाऱया पथकाचे आटपाडी तालुक्यातील पात्रेवाडी येथे आगमन झाले. खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिलराव बाबर, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी पथकाचे स्वागत केले.

पथक जाणाऱया रस्त्यावरच शेटफळे येथे सुरू असणाऱया टँकरने पिण्याच्या पाण्याच्या वाटपाचे भयान चित्र पथकाच्या निदर्शनास पडले. लेंगरेवाडी येथे दुर्योधन लेंगरे, बिरा लेंगरे या शेतकऱयांच्या कोरडय़ा विहिरींची पाहणी पथकाने केली. तसेच वाया गेलेल्या पेरणीचीही पाहणी करून पथकाने शेतकऱयांशी संवाद साधला. पिण्याच्या पाण्याची समस्या, जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न याबाबत विस्तृत माहिती घेत पथकाचे प्रमुख भारतीय खाद्य निगमचे सह. संचालक सुभाषचंद्र मिना यांनी शेतकऱयांशी चर्चा केली.