|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला

मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

मराठा आरक्षणाविरोधत याचिका करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाबाहेर हा हल्ला करण्यात आला आहे. उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरु होती. यानंतर न्यायालयात काय घडलं यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना एका व्यक्तीने एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला केला. यावेळी तिथे उपस्थित इतर वकिलांनी त्या व्यक्तीला अडवत त्याला चांगलाच चोप दिला.

 

गुणरत्न सदावर्ते यांनी याआधीही आपल्याला धमक्मया मिळत असल्याचं सांगितलं होतं. आज न्यायालयातही या विषयावर चर्चा झाली. हल्ला होण्याआधी गुणरत्न सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आम्ही प्रसारमाध्यमांशी का बोलतो यावर प्रश्न विचारण्यात आला ? यावर आम्हाला एक हजाराहून जास्त धमक्मया मिळाल्या आहेत. आमची हत्यादेखील केली जाईल असं आम्ही न्यायालयात सांगितलं. यावर न्यायालयाने दोन्ही पक्षांना अशा प्रकारे धमकावणं चुकीचं असल्याचं सांगितले.

 

न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करण्यात आला असता न्यायालयाने कोणत्याही व्यक्तीला आपलं मत प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. न्यायालयातील जबाबादार व्यकीतर पक्षपातीपणाचा आरोप करणं चुकीचं आहे असं स्पष्ट केले होते.

 

मारहाण करणाऱया व्यक्तीने आपलं नाव वैजनाथ पाटील असून जालना जिल्ह्याचे रहिवासी असल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे. वैद्यनाथ पाटील नेमका कोण आहे याबद्दल माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे.