|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शिक्षणाच्या वारीतून ज्ञानसंचय

शिक्षणाच्या वारीतून ज्ञानसंचय 

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे प्रतिपादन: स्काईपवरून साधला संवाद

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शिक्षणाच्या वारीत राज्यभरातून कौशल्यावर आधारीत उत्कृष्ठ शैक्षणिक साहित्याचे स्टॉल लावले आहेत. शिक्षकांच्या विविध प्रयोगशील संकल्पनांमुळे  शैक्षणिक गुणवत्ते महाराष्ट्र तिसऱया क्रमांकावर असला तरी भविष्यात देशात अव्वल असेल. या शिक्षणाच्या वारीतून शिक्षक व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ज्ञानसंचय मिळेल, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाच्या वतीने तपोवन मैदानावर शिक्षणाच्या वारीचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व बालभारती संचालक डॉ. सुनील मगर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षणमंत्री तावडे यांनी स्काईपवरून संवाद साधला.

शिक्षणमंत्री तावडे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर हे शहर आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिकदृष्टय़ा सबळ आहे. त्यामुळे यंदा शिक्षणाची वारी हा उपक्रम कोल्हापूरात ठेवला आहे. येथील स्थानिक शिक्षकांना प्रयोगशील शैक्षणिक साहित्याचा अभ्यास करता येईल. सध्या शिक्षणामध्ये नवनवीन प्रयोग करून पारंपारिक शिक्षणाबरोबर कौशल्यावर आधारीत शिक्षण देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे. दहावीच्या फेरपरीक्षा, ऑनलाईन कलचाचणी, शाळा जोडणारा सेतू असे अनेक प्रयोग शिक्षकांमुळे यशस्वी झाले आहेत. त्यामुळे शिक्षकांनी या शिक्षणाच्या वारीतून केलेल्या ज्ञानसंचयाचा उपयोग आपल्या शाळेच्या प्रगतीसाठी करावा, असे आवाहनही शिक्षणमंत्री तावडे यांनी केले.

 शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना उपस्थित शिक्षण व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षकांनी व्हिडीओ कॉलवरून प्रश्न विचारले. या प्रश्नाला सकारात्मक उत्तरे दिली. खाजगी शाळा जवळ असतानाही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याने, जिल्हा परिषदेच्या शाळेकडे मुलांचा ओढा वाढत आहे. त्यामुळे शिक्षकांनी चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा, समायोजनाचा प्रश्न मिटला. येत्या काही दिवसात पवित्र पोर्टलव्दारे नोकरभरतीही होईल. त्यामुळे  ‘गुढी पाडवा व पटसंख्या वाढवा’ उपक्रम जोमाने राबवता येईल. चौथी व सातलीला शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा विचार करू असेही प्रश्नोत्तरामध्ये तावडे यांनी सांगितले. 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व बालभारती संचालक डॉ. सुनील मगर म्हणाले, शिक्षणाच्या वारीतील नव संकल्पनांचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षणाचा रथ पुढे नेण्यास मदत होईल.  शाळा व विद्यार्थी निहाय समस्या समजून घेऊन शिक्षकांनी सृजनशील मार्ग शोधावा. 1 हजार 900 शाळा डिजीटल झाल्या आहेत, मात्र या शाळेतील तंत्रज्ञानाचा फायदा प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकाला झाला पाहिजे. दहावी-बारावीच्या कृतीपत्रिकेचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या कृतीपत्रिका प्रशिक्षणाचा व शिक्षणाच्या वारीतील ज्ञानाचा उपयोग शिक्षकांनी अध्ययनात करावा, असा सल्लाही डॉ. मगर यांनी दिला. शालेय शिक्षणमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी प्राची साठे म्हणाल्या, स्टॉलच्या माध्यमातून कौशल्यावर आधारीत शिक्षण राज्यभर पसरवले आहे. त्यामुळे या शिक्षणाच्या वारीतील ज्ञानकण वेचून घ्या. कोल्हापूरचे शिक्षण सभापती अंबरिशसिंह घाटगे म्हणाले, जिल्हय़ातील 1 हजार 900 शाळांसाठी एकच सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तेला बळकटी मिळाली आहे.

डायटचे प्राचार्य डॉ.आय.सी.शेख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संदीप मगदूम व सविता कुंभार यांनी केले. शिवशाहीर आझाद नाईकवडी यांनी शिक्षणाच्या वारीसंदर्भात आल्या पोवाडय़ातून महत्व विषद केले. प्रभारी शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी.पाटील , संचालक दिनकर पाटील , उपसंचालक डॉ.अशोभा खंदारे ,प्रभाकर क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूरचे विभागीय सचिव टी. एल. मोळे, शिक्षणाधिकारी आशा उबाळे,  माध्यमिक शिक्षणाधीकारी किरण लोहार, निशादेवी वाघमोडे , बी. एम. कासार , प्राचार्य ए. पी. पाटील , सुशील शिवलकर , आदी प्रमुख उपस्थित होते. तसेच अधिकारी मुख्याध्यापक , अध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.