|Thursday, June 20, 2019
You are here: Home » leadingnews » श्रीलंकन महिलेचा शबरीमला मंदिरात प्रवेश

श्रीलंकन महिलेचा शबरीमला मंदिरात प्रवेश 

ऑनलाईन टीम /  तिरुअनंतपुरम :

  शबरीमला मंदिरात नुकतेच दोन महिलांच्या प्रवेशाची घटना ताजी असताना गुरुवारी श्रीलंकेतून आलेल्या एका महिलेने शबरीमला मंदिरात प्रवेश करत अयप्पाचे दर्शन घेतले आहे. शशीकला असे या महिलेचे नाव आहे. रात्री 9 वाजता त्यांनी मंदिरात प्रवेश केला आणि त्या सुखरुप परत आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

 बुधवारी शबरीमला मंदिरात प्रवेशबंदीची शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढत अयप्पाचे दर्शन घेतल्याची ऐतिहासिक घटना घडल्यानंतर केरळमध्ये हिंसाचार उसळला होता. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. 10 आणि 50 वर्षांच्या महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी दिला होता. मात्र या आदेशानंतरही आतापर्यंत कोणत्याही ‘प्रतिबंधित’ वयाच्या महिलांनी अयप्पाचे दर्शन घेतलेले नाही. अनेक महिला कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्नही केला होता. परंतु मोठ्या विरोधामुळे त्यांना प्रवेश करता आला नाही. बुधवारी दोन महिलांनी अयप्पा दर्शनाचा अधिकार बजावला. या ऐतिहासिक घटनेनंतर गुरुवारी केरळमध्ये बंदची हाक देण्यात आली होती. शबरीमला कर्म समिती व आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेने बंदची हाक दिली होती. या बंदला हिंसक वळण लागले होते.  बंदमुळे तणाव निर्माण झाला असतानाच दुसरीकडे गुरुवारी रात्री श्रीलंकेतून आलेल्या शशीकला कुमारन या महिलेने देखील शबरीमला मंदिरात जाऊन अयप्पाचे दर्शन घेतले. रात्री साडे नऊच्या सुमारास महिलेने अयप्पाचे दर्शन घेतले आणि 11 वाजता महिलेला सुरक्षित बाहेर नेण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.