|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मानवी अंतरंग उलगडले पुस्तकाच्या पानातून

मानवी अंतरंग उलगडले पुस्तकाच्या पानातून 

सुनील पाटील/ आजरा

आजऱयातील यंदाच्या 5 व्या कै. रमेश टोपले राज्यस्तरीय नाटय़महोत्सवात चौथ्या दिवशी सांगली येथील नवरंग सांस्कृतिक कलामंचने ‘पुस्तकांच्या पानातून’ हे नाटक सादर केले. लेखक रविशंकर झिंगरे यांच्या या नाटकातील पटकथा, संवाद रसिकांना अंतर्मुख करत असून मानवी अंतरंग उलगडणारे हे नाटक ठरते.

नाटकातील पात्राला स्वातंत्र नसतं लेखकाने ज्याची भूमिका जशी लिहीली आहे तशी ती त्याला वठवावी लागते. असे सांगत असताना यातील प्रसूनच्या व्यक्तीरेखेतून निसर्गाने माणूस म्हणून ज्याला जसं दिले आहे ते घेऊन जगलं पाहिजेत. बोलताना अडखळणारा पण लेखनीतून शब्दावंर प्रभुत्व गाजवणारा प्रसून आणि वाणीतून शब्दांवर पकड मिळविलेली अश्लेषा या दोन पात्रांभोवतीच नाटक फिरत असले तरी नाटकाचा खरा अर्थ उलडगणारे पात्र महिच ठरतो. नाटक या शब्दाप्रमाणेच माणून आपल्या आयुष्यात खरे-खोटे मुखवटे घालून किती नाटकी वागत असतो, माणसाचे बेगडी चेहरे या नाटकातून मांडण्याचा प्रयत्न झाला आहे.

अश्लेषावर एकतर्फी प्रेम करणाऱया प्रसूनला त्याचे बोलताना अडखळण्याचे शारीरीक व्यंग अडचणीचे ठरू लागते. तेंव्हा प्रसून नाटक लिहून आपली कल्पना रंगवू लागतो. पण ते नाटक कोणाच्याही हाती लागू नये याची तो काळजी घेतो. एकदिवस ते महिच्या हाती लागते. आपल्या नाटकात तो प्रसून शुद्ध आणि स्पष्ट बोलणारा आणि अश्लेषा अडखळत बोलणारी असे पात्र रंगवितो. अडखळत बोलणारी अश्लेषा असती तरीही आपणी तीला आपलसं केलं असतं असे दाखविण्याचा प्रयत्न तो करतो.

प्रसूनच्या विनंतीनुसार मित्राला प्रेमात मदत करण्याचा शब्द दिलेला महि त्याच्या या नाटकाचा आधार घेत प्रसूनला वाईट ठरवून अश्लेषाचे प्रेम स्वत: मिळविण्याचा प्रयत्न करतो. मूळचा अडखळत बोलणारा आणि हळव्या कविता लिहीणारा प्रसून किती भयंकर आणि विचित्र विचार करतो हे त्याने लिहीलेल्या नाटकातून पुढे येते. यातून लेखकाने मानवी मनाच्या अंतरंगाचे प्रदर्शन मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रसूनने लिहीलेले नाटक वाचण्यासाठी त्या पुस्तकाचे पान महि उघडत असताना नेपथ्यामध्ये पुस्तकाचा प्रभावी वापर करून त्या पुस्तकाचे उघडणे आणि बंद होणे याचा चांगला परीणाम नाटकात साधता आला. प्रसूनचे स्वगतही प्रेक्षकांना भावणारे होते. संपूर्ण नाटकात प्रसून, महि आणि अश्लेषा या तीनही कलाकारांचा उत्तम संवाद आणि टायमिंग साधलेले होते. यामुळे अनेकवेळा रसिकांनी टाळय़ा वाजवून दाद दिली. खासकरून अडखळत बोलणारा आणि स्वगत सहजपणे पण उत्कृष्ट मांडणारा प्रसून रसिकांना भावला. रंगमंचावरील कलाकारांचा सहज वावर, उत्तम प्रकाश योजना आणि नेपथ्य उत्तम होते. सर्वच कलाकारांनी आपापली भूमिका ताकदीने सादर केली.