|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » युतीसाठी प्रयत्न करू, अन्यथा स्वबळावर लढू : रावसाहेब दानवे

युतीसाठी प्रयत्न करू, अन्यथा स्वबळावर लढू : रावसाहेब दानवे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भाजप, शिवसेनेत युती व्हावी ही जनतेची इच्छा आहे. जनतेच्या भावनेचा आदर म्हणून शिवसेनेसह समविचारी पक्षाशी युती करुन लोकसभा आणि विधनसभा निवडणुका लढविण्याची भाजपची भूमिका आहे. मात्र जे सोबत येणार नाहीत, विरोधत जातील त्यांना आडवे करण्याची ताकत पक्षात आहे. युती न झाल्यास लोकसभेच्या 48 जागा स्वबळावर लढल्या जातील. संघटनेच्या बळावर निवडणूक जिंकण्याची तयारी पक्षाने केली आहे, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना दिला. त्याचवेळी त्यांनी शेतकऱयांच्या कर्जमाफीसह अन्य प्रश्नांना बगल देत पत्रकार परिषद आटोपती घेतली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने मतदारसंघनिहाय आढावा बैठका सुरू केल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी आतापर्यंत विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबईसह 36 मतदारसंघाचा दौरा पूर्ण केला आहे. सोमवारी ते कोल्हापूर दौऱ्यावर होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चाचपणी केली. युतीचा निर्णय दिल्लीत नव्हे तर मुंबईत होईल. शिवसेनेसोबत युती करण्यासाठी चर्चेला तयारी दाखविताना त्यांनी काँग्रेसच्या आघाडीच्या राजकारणावर टीकास्त्र सोडले. काँग्रेसच्या नेत्यांपेक्षा देशात अन्य कुठलाही नेता मोठा होऊ नये ही काँग्रेसची मानसिकता आहे. त्या मानसिकतेतूनच एक गरीब पंतप्रधान झाला या रागापोटी मोदींवर टीका करत आहेत. सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान होऊ शकतो हे काँग्रेसला मान्य नाही. भाजपला हरविण्यासाठी काँग्रेसने कितीही आघाडय़ा केल्या, पक्ष एकत्र आले तरी संघटना आणि विकास कामांच्या बळावर भाजप पुन्हा जिंकणार आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.