|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नऊ दुचाकी चोरटय़ांना अटक : 13 वाहने जप्त

नऊ दुचाकी चोरटय़ांना अटक : 13 वाहने जप्त 

प्रतिनिधी/ खानापूर

शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी वाहनचोरीचे प्रकार वाढले होते. दुचाकी चोरीच्या वाढत्या प्रकारांमुळे खानापूर पोलिसांसमोर मोठी डोकेदुखी झाली होती. परंतु, अखेर दुचाकी चोरीचा तपास लावण्यात खानापूर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून 13 दुचाकी वाहने चोरी केल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी अटक केलेल्यांमध्ये किसन ऊर्फ नाक्या बी. नाईक (वय 23) रा. भट्ट गल्ली खानापूर, विवेक व्ही. अवलक्की (वय 20) रा. दुर्गानगर खानापूर, राहुल एस. बुरूड (वय 19) रा. असोगा रोड खानापूर, रामलिंग ऊर्फ जग्गा जे. सुळकर (वय 20) रा. रेल्वे स्टेशन रोड खानापूर, ओमकार एस. कणबरकर (वय 19) रा. निंगापूर गल्ली खानापूर, अमित ऊर्फ डायमंड व्ही. नाईक (वय 22) रा. संभाजीनगर वडगाव, आशुतोष एन. देसाई (वय 21) रा. निंगापूर गल्ली खानापूर, मष्णू डी. कुंभार (वय 25) रा. बुरूड गल्ली खानापूर यांचा समावेश आहे.

पोलिसांनी त्यांच्याकडून एक करिझ्मा, 4 यामाहा, 4 स्प्लेंडर, 1 टिव्हीएस स्पोर्ट्स, 2 होंडा डिओ, 1 होंडा एक्स्ट्रीम अशी एकूण 13 वाहने जप्त केली आहेत. या वाहनांची एकूण किंमत 2 लाख 61 हजार 500 रुपये आहे. सदर प्रकरणाचा तपास बैलहोंगल विभागाचे पोलीस उपअधिक्षक करुणाकर शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर पोलीस निरीक्षक मोतीलाल पवार, पोलीस उपनिरीक्षक बसनगौडा पाटील व त्यांचे सहकारी शिवकुमार बळ्ळारी, अरुण हुक्केरी, सतीश माग, जगदीश काद्रोळी, विष्णू मोकाशी, पांडू तुरमुरी, जयराम अंम्मन्नवर आदींनी केला.

चोरलेल्या 13 वाहनांपैकी 11 वाहने खानापूर परिसरातील तर 2 वाहने बेळगाव परिसरातील आहेत.