|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » स्वतःच्या चोऱया लपवण्यासाठी भाषणबाजी ; पंकजा मुंडेंची काँग्रेसवर टीका

स्वतःच्या चोऱया लपवण्यासाठी भाषणबाजी ; पंकजा मुंडेंची काँग्रेसवर टीका 

ऑनलाईन टीम / नांदेड :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुटुंब नसल्याची टीका केली जाते. पण नरेंद्र मोदी यांचं कुटुंब ही जनता आहे. स्वतःच्या चोऱया लपवण्यासाठी भाषणे करतात चोर कुठले, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर बोचरी टीका केली. पंकजा मुंडे नांदेड जिह्यातील नरसीमध्ये एका खाजगी पुरस्कार वितरण सोहळय़ासाठी उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱयांवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील प्रत्येक नागरिकाला आपले कुटुंब समजून काम करतात. मात्र हे कालचे आलेले नेते स्वतःच्या चोऱया लपवण्यासाठी भाषणे करतात. चोर कुठले, यांनी या राज्याला लूटले, या देशाला लूटले आणि हे लोकं सांगतात की नरेंद्र मोदी यांना कुटुंब नाही. पण या देशातील गरीब, वंचित, पीडित जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परिवार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या नरसी येथील जय भारत शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान सोहळय़ात बोलत होत्या. पंकजा मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला. नांदेड जिह्याला देशातील आणि राज्यातील सर्वोच्च पदे मिळाली. पण नांदेड जिह्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही. आजही नरसी येथे पाण्याची समस्या आहे. माझ्याकडे राज्याचे मंत्रीपद असले तरी मी बीड जिह्याकडे दुर्लक्ष करत नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हे केंद्रीय गृहमंत्री होते. शिवाय त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदही भूषवले आहे. तर अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी विकासाच्या मुद्यावरुन दोघांवरही निशाणा साधला.