|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खेड, रत्नागिरीत चोरटय़ांचा धुडगूस

खेड, रत्नागिरीत चोरटय़ांचा धुडगूस 

एकाच रात्री एकूण सहा लाखांचा ऐवज लंपास

प्रतिनिधी/ खेड

शनिवारी रात्री जिल्हय़ात चोरटय़ांनी धुमाकूळ घालत खेड-स्वरुपनगर व रत्नागिरीनजीकच्या मिरजोळे येथे 6 सदनिका फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. यामुळे जिल्हय़ात खळबळ उडाली असून पोलिसांची झोपच उडाली आहे. दरम्यान या दोन्ही घटनांमध्ये चोरटय़ांचा माग काढण्यात श्वानपथकाला अपयश आले आहे..

 खेड शहरातील स्वरूपनगर येथील गोकुळ अपार्टमेंटमधील 3 फ्लॅट फोडल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यातील एका फ्लॅटमधून पावणेचार लाखांचा सोन्याचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केल्याची बाब उघड झाली आहे. स्थानिकांनी चोरटय़ांना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र चोरटे दोन दुचाकी रस्त्यातच टाकून निसटले. एकाच रात्री घडलेल्या तीन घरफोडय़ांनी पोलिसांची झोप उडाली आहे. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी पाचारण करण्यात आलेल्या श्वानपथकासही अपयश आले. ओंकार अनंत गोंदकर (गोकुळ अपार्टमेंट, स्वरुपनगर) यांनी येथील पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार, ते कुटुंबीयांसमवेत महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथून घरी परतत असताना अचानक मित्राने मोबाईलवर संपर्क साधून फ्लॅट फोडल्याची कल्पना दिली. घरी परतल्यानंतर कपाटातील तब्बल 4 लाख 35 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरटय़ांनी लंपास केल्याचे निदर्शनास येताच त्यांना धक्का बसला. याच अपार्टमेंटमधील अन्य दोन फ्लॅट फोडल्याचेही पुढे आले असून या ठिकाणी चोरटय़ांच्या हाती काहीच लागले नाही. या अपार्टमेंटमध्ये एकूण 10 फ्लॅटधारक असून चोरटय़ांनी घरफोडी करताना अन्य फ्लॅटधारकांच्या घरांना बाहेरून कडय़ा लावल्याने आतील रहिवाशांना काहीच करता आले नाही. या अपार्टमेंटपाठोपाठ लगतचेही घर फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

चोरीसाठी चोरीच्या दुचाकीचा वापर

चोरटय़ांचा धुमाकूळ सुरू असल्याची बाब समजताच परिसरातील स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुण आपल्या मागावर असल्याची चाहुल लागताच चोरटय़ांनी दुचाकी रस्त्यातच टाकून पलायन केले. यातील एक दुचाकी काळकाई मंदिराजवळ, तर दुसरी दुचाकी कशेडीनजीक आढळली. या दोन्ही दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या दुचाकीदेखील चोरीच्याच असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. चोरटे सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

घरफोडीची खबर मिळताच सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड व सहकाऱयांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करत संपूर्ण परिसर पिंजून काढला. घरफोडीसाठी चोरटय़ांनी वापरलेल्या दुचाकींसह कटावणी व अन्य साहित्यही पोलिसांच्या हाती लागले आहे. दरम्यान, घरफोडीप्रकरणी चोरटय़ांचा माग काढण्यासाठी पाचरण करण्यात आलेल्या श्वानपथकाने घटनास्थळापासून थेट काळकाई मंदिरापर्यंत चोरटय़ांचा माग काढला. तिथून श्वानपथक कशेडीच्या दिशेने माग काढू लागले. मात्र श्वानपथकासही चोरटय़ांचा माग काढण्यास अपयश आले. चोरटय़ांनी अन्य दुचाकीवरून कशेडीच्या दिशेने पलायन केले असल्याचा अंदाज पोलिसांनी काढला आहे. एकाच रात्री घडलेल्या तीन घरफोडय़ांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरटय़ांचा पोलीस कसून शोध घेत असून लवकरच चोरटय़ांच्या मुसक्या आवळू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

मिरजोळे-रेल्वे कॉलनीत चोरटय़ांनी मारला डल्ला

रत्नागिरी शहरालगत असलेल्या मिरजोळे-पाडावेवाडी येथील रेल्वे कॉलनीमध्ये चोरटय़ांनी 3 सदनिका फोडून 1 लाख 43 हजाराचा ऐवज लंपास केल़ा ही घटना रेल्वे कॉलनीमधील वाशिष्टी इमारतीमध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास घडल़ी या प्रकरणी सुधीर शंकर पवार (35, ऱा रेल्वे कॉलनी, मिरजोळे) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार रविवारी सकाळी तक्रारदार हे काम आटोपून आपल्या घरी आले असता त्याच्या सदनिकेचे कुलूप चोरटय़ांनी फोडलेले आढळून आल़े तसेच त्या ठिकाणी असेलेल्या योगेश गंगाधर सावंत व अनंत नारायण महाबळे (ऱा मिरजोळे, रेल्वे कॉलनी) यांच्या मालकीच्या सदनिकादेखील यावेळी चोरटय़ांनी फोडल्याचे दिसून आल़े

यामध्ये सुधीर पवार यांच्या सदनिकेतून चोरटय़ांनी 15 हजार किंमतीचा सोन्याचा हार, 15 हजार किंमती सोन्याची चेन, 6 हजाराचे कानातील जोड, 30 हजारचे ब्रेसलेट, 10 हजार रोख असा मिळून 76 हजारांचा ऐवज चोरून नेला तर योगेश सावंत यांच्या घरातील 18 हजार किंमतीची सोन्याची अंगठी, 21 हजार कानातील कुडी, 6 हजार रोख असा 66 हजार किंमतीचा ऐवज चोरून नेल़ा या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आह़े..