|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पैंगीण येथे ट्रकच्या धडकेने 4 दुकाने जमीनदोस्त

पैंगीण येथे ट्रकच्या धडकेने 4 दुकाने जमीनदोस्त 

 

प्रतिनिधी/ काणकोण

मडगाव-कारवार मार्गावरील पैंगीण बाजारात 9 रोजी मध्यरात्री झालेल्या एका अपघातात एका अवजड ट्रकाच्या धडकेने पैंगीण बाजारातील चार दुकानांची पूर्णपणे हानी झालेली असून अनंत अग्नी यांच्या घराची मोडतोड झाली आहे. या अपघातात पन्नास लाखांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असला, तरी वाहनचालक दारूच्या नशेत असावा, असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.

कारवारच्या दिशेने जाणाऱया सदर लोखंडवाहू ट्रकाने प्रथम पैंगीण बाजारात उजव्या बाजूला असलेल्या अग्नी यांच्या घराला धक्का दिला आणि त्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या प्रदीप पैंगीणकर, गुणो कुडाळकर, शशिकांत पैंगीणकर आणि विराज महाले यांच्या दुकानांना धक्का दिला. या अपघातात सर्वाधिक नुकसान शशिकांत पैंगीणकर यांच्या स्टेशनरीच्या दुकानाचे आणि प्रदीप पैंगीणकर यांच्या शिलाईच्या दुकानाचे नुकसान झालेले आहे. शशिकांत पैंगीणकर यांचे पैंगीण बाजारात मागच्या पन्नास वर्षांपासून स्टेशनरीचे दुकान असून या अपघातात त्यांच्या दुकानाची पूर्णपणे हानी झालेली आहे. सर्व माल त्याचप्रमाणे दुकानाची इमारत मोडून गेली आहे.

अन्य तीन दुकानांची तशीच अवस्था झालेली आहे. प्रदीप पैंगीणकर यांचे दुकान त्यांचे भाऊ विनोद पैंगीणकर चालवत असून त्या ठिकाणी ते शिलाईचा व्यवसाय करायचे, तर विराज महाले केशकर्तनालय चालवायचे. या सर्व दुकानांची मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे. अग्नी यांच्या घराचे प्रवेशद्वार आणि खिडकी मोडली आहे. या अपघाताची खबर मिळताच काणकोणचे पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई त्वरित घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी पंचनामा केला.

चालक पोलिसांच्या ताब्यात

या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताची खबर मिळताच मध्यरात्रीच सर्व संबंधित दुकानदार घटनास्थळी धावून आले. दिवसा जर ही घटना घडली असती, तर फार गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती. हा रस्ता वाहतुकीला अत्यंत धोकादायक असून काही वर्षांपूर्वी अशाच अपघातात उल्हास पैंगीणकर या व्यापाऱयाचा हकनाक बळी गेला होता, याची आठवण स्थानिकांनी यावेळी करून दिली.

चालू आठवडय़ातील दुसरी घटना

चालू आठवडय़ात पैंगीण गावात घडलेली ही अशा प्रकारची दुसरी घटना असून या रस्त्यावरून अवजड मालवाहतूक बंद करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येऊ लागली आहे. ज्या मालवाहू वाहनामुळे हा अपघात घडला त्या वाहनात दारूच्या बाटल्या आणि रिकामे ग्लास सापडले आहेत. याचाच अर्थ दारूच्या नशेत वाहने हाकली जातात. मालवाहू वाहनांच्या चालकांची कसून तपासणी व्हायला हवी. हा रस्ता अवजड वाहनांसाठी सुरक्षित नाही. रस्त्याच्या बाजूला असलेली दुकाने आणि घरे यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक त्वरित बंद करावी नपेक्षा रस्त्यावर यावे लागेल, असा इशारा दिलीप केंकरे, सतीश पैंगीणकर, विशांत प्रभुगावकर यांनी दिला.

मालवाहू वाहनांच्या तपासणीची मागणी

मालवाहू वाहनांची त्याचप्रमाणे चालकांची तपासणी व्हायलाच हवी. या रस्त्यावरून जाणारे प्रत्येक मालवाहू वाहन दारूच्या बाटल्या घेऊन जात असावे, असा संशय काही जणांनी व्यक्त केला आहे. काणकोणचे पोलीस नको त्या वाहनांची  विशेषतः सामान्य दुचाकीची तपासणी करतात. गिमणे येथे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. त्यामुळे त्या ठिकाणी देखील अपघात घडण्याची शक्यता आहे, असे मत दिलीप केंकरे यांनी व्यक्त केले.

बाजार बाजूला न्यावा : आमदार फर्नांडिस

पैंगीण बाजारात झालेल्या अपघातात ज्या व्यक्तींचे नुकसान झालेले आहे. त्यांच्याविषयी आपल्याला पूर्ण सहानुभूती आहे. हाच अपघात जर दिवसा घडला असता, तर पैंगीण बाजारात फार भयानक परिस्थिती निर्माण झाली असती, अशी प्रतिक्रिया काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी व्यक्त केली. आपण मागच्या कित्येक वर्षांपासून पैंगीणचा बाजार रस्त्याच्या बाजूला नेण्याची मागणी करत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. संभाव्य धोका टाळण्यासाठी हा बाजार डोंगर कापून घेऊन बाजूला न्यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.