|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विचार व मनोरंजनाची फोंडय़ात यादगार ‘उन्नती’

विचार व मनोरंजनाची फोंडय़ात यादगार ‘उन्नती’ 

प्रतिनिधी /फोंडा :

मान्यवर महिलांचे विचार, सुरेख नृत्याविष्कार, हास्यविनोद आणि श्रोत्यांसाठी उत्स्फूर्त बक्षिसांची खैरात….लोकमान्य मल्टिपर्पज कॉ ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे महिलांसाठी फोंडा येथे आयोजित केलेला ‘उन्नती’ हा कार्यक्रम यादगार ठरला. राजीव गांधी कला मंदिरमध्ये काल गुरुवारी दुपारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला फोंडा तालुक्यासह विविध भागातील महिलांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावून या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन फोंडा पालिकेच्या नगरसेविका व लेखपाल गिताली तळावलीकर यांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलीत करुन करण्यात आले. प्रमुख वक्त्या म्हणून त्वचा तज्ञ डॉ. अनुपमा कुडचडकर, ऍड. स्वाती केरकर व लोकमान्यच्या संचालिका सई ठाकुर बिलजानी या व्यासपीठावर उपस्थित हेत्या.

आजची महिला सक्षम व धैर्यशिल

 आजच्या महिला सक्षम व धैर्यशिल आहेत. त्यांना आपल्या स्वातंत्र्याविषयी पुरेपुर जाणिव आहे. मात्र कुटुंबात वावरताना तिला काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागेल. तेव्हाच कुटुंब सुखाने नांदेल असे गिताली तळावलीकर यावेळी बोलताना म्हणाल्या. स्वावलंबी होण्यासाठी महिलांनी कुठल्याही वयात विविध गोष्टी शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.

 चेहराच नव्हे, अंतरंगही सुंदर हवे

 स्त्री ही परमेश्वराने निर्मिलेली सुंदर कलाकृती आहे. ती सुंदर तर आहेच शिवाय विविध गुणसंपन्नही आहे. तिने खंबीर राहून उन्नती व प्रगतीकडे वाटचाल केली पाहिजे, असे डॉ. अनुपमा कुडचडकर म्हणाल्या. सौदर्य प्रसाधने व त्यासंबंधीचे समज गैरसमज, स्वच्छता, आहार याविषयी त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. प्रत्येकाने आपल्या सौदर्यांबाबत समाधानी असले पाहिजे. केवळ चेहरा सुंदर असून चालत नाहीत अंतरंगही तेवढीच सुंदर हवे असे त्या पुढे म्हणाल्या.