|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » निवडणुकीशी निगडित आर्थिक मुद्दे

निवडणुकीशी निगडित आर्थिक मुद्दे 

निवडणूक प्रचाराच्या संदर्भात एक काळ होता, ज्यावेळी आर्थिक मुद्यांना निवडणुकीच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व दिले जायचे. गरिबी हटाव, संस्थानिकांचे तनखे बंद करणे, बँकांचे राष्ट्रीयीकरण यासारख्या तद्दन आर्थिक मुद्यांवर राजकारण धुरंधर अशा इंदिराजींनी निवडणूक जिंकण्याचे तंत्रज्ञान यशस्वीपणे साधले होते. कालौघात आर्थिक मुद्दे तुलनेने दुर्लक्षिले गेले तरी आर्थिक मुद्यांआडच्या राजकारणाचे महत्त्व आणि महात्म्य मात्र कायम राहिले. उदाहरणार्थ मायावती अथवा रमणसिंहांसारख्यांनी आपापल्या राज्यातील मागासलेल्यांसाठी आर्थिक योजनांच्या घोषणा आणि अंमलबजावणीचा सपाटा लावला याचाच अर्थ असा की आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी ही मंडळी सरकारी योजनांचा वापर निश्चितपणे करीत असतात. मध्यंतरी जातीय राजकारणाचा  बराच बोलबाला झाला होता. यासाठी लालूप्रसाद यादव यांचा पुढाकार प्रामुख्याने होता. नंतर मात्र त्यांच्या ‘यादवी’ राजकारणाला कंटाळून बिहारी जनता आणि मतदारांनी राजकीय बदलाच्या बाजूने कौल दिला. हाच मुद्दा घेऊन नितीशकुमारांनी मुख्यमंत्रीपद मिळाल्यावर जातीय राजकारणाला आर्थिक विकासकारणाची जोड दिली. राज्याच्या सर्व जिल्हास्थानी होणाऱया मंत्रीस्तरीय बैठका सतरंजीवर बसून घेतल्या व बिहारच्या राजकारणाला वेगळीच दशा आणि दिशा प्रदान केली. मतदारावर जातीगत मतदार आणि राजकारणाचा प्रभाव पडतो हे एक सर्वमान्य राजकीय गृहितक असले तरी आर्थिक आधारावर व जन-सामान्यांशी निगडित मुद्दे हे प्रसंगी जातीगत मुद्यांपेक्षा प्रभावी ठरतात. उदाहरणार्थ विदर्भ वा आंध्र प्रदेशातील शेतकऱयांच्या आत्महत्या, नापिकी, आर्थिक पिळवणूक, नियोजनाचा अभाव यामुळे या भागातील शेतकरी देशोधडीलाच लागला. यातूनच सरकारला विदर्भासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे लागले, मात्र त्याचा विशेष व सकारात्मक असा परिणाम झाला नाही. परिणामी अशा क्षेत्रातील मतदार जातीचा नव्हे तर आर्थिक पतीचा विचार करणे स्वाभाविक आहे. राजकारण आणि अर्थकारणाच्या संदर्भात मध्यंतरी ‘बीएसपी’ ही शब्दावली खूपच गाजली होती ती दुहेरी संदर्भात यापैकी बीएसपीचा पहिला संदर्भ अर्थातच मायावतींचा ‘बहुजन समाज पक्ष’ होता तर त्याचवेळी मध्य प्रदेशच्या संदर्भात बीएसपी म्हणजे ‘बिजली-सडक-पाणी’ हे मुद्दे व त्यांची राज्यातील त्यावेळची दयनीय अवस्था होती. या दुसऱया बीएसपीमुळेच दिग्विजयसिंग मध्य प्रदेशात पराभूत झाले व त्यानिमित्ताने पण आर्थिक मुद्यांचा निवडणुकीवरील प्रभाव अधोरेखित झाला.                              

-द.वा. आंबुलकर