|Monday, June 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ढोल-ताशांच्या गजरात रंगला भद्रा, पौर्णिमेचा ‘शिमगोत्सव’

ढोल-ताशांच्या गजरात रंगला भद्रा, पौर्णिमेचा ‘शिमगोत्सव’ 

प्रतिनिधी /रत्नागिरी :

कोकणची संस्कृती जपणारा पारंपारिक सण-शिमगा गुरूवारी धुलीवंदनाच्या दिवशी जिल्हाभरात जल्लोषात साजरा झाला. ‘हुरा रे हुरा, आमच्या देवाचा सोन्याचा तुरा रे होलियो’ ‘करवत रे करवत, आमच्या देवाची पालखी निघाली मिरवत रे होलियो’ अशा फाकांतून देवाचा जयघोष करत शिमग्याचा आनंद सर्वत्र द्विगुणीत झालेला दिसून आला. कोकणच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतिबिंबाची अनुभूती सर्वत्र दिसून आली.

 गुरूवारी भद्रा आणि पौर्णिमेच्या शिमग्यांचा जल्लोष जिल्हय़ातील गावांगावांमध्ये पहावयास मिळाला. मानकरी मंडळी, गावकरी आणि चाकरमानी यांच्या साथीने कोकणच्या संस्कृतीची अनुभूती देणाऱया शिमगोत्सवाची धुम रत्नागिरी जिल्हात सुरू आहे. 

   रत्नागिरीच्या बारा वाडय़ांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरीबुवाचा शिगमोत्सव देखील गुरूवारी मोठय़ा भक्तीपूर्ण व जल्लोषात साजरा झाला.  फाल्गुन पौर्णिमेला बुधवारी मध्यरात्री 12 वा. श्रीदेव भैरीबुवाच्या प्रांगणाबाहेर सडामिऱया व जाकीमिऱया येथील श्री नवलाई-पावणाई आणि देव म्हसोबा  या दोन पालख्यांच्या भेटीचा अनोखा सोहळा पार पडला. प्रतिवर्षीप्रमाणे हा सोहोळाही मोठय़ा उत्साहात पार पडला. यावेळीही बारा वाडय़ांतील ग्रामस्थ युवा, महिलावर्गाने श्री भैरीच्या प्रांगणात अलोट गर्दी केली होती. या देवतांच्या पालख्या श्री देव भैरीला भेटावयास येतात. ब्रिटीशकालापासून असलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात साजरी केली जाते.