|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाच नाही – सपना चौधरी

मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाच नाही – सपना चौधरी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सपना चौधरीने पत्रकार परिषद घेऊन आपण कुठलाही राजकीय पक्ष जॉइन केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रसिद्ध डान्सर आणि सिंगर सपनाने काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले असे वृत्त सर्वच माध्यमांनी लावून धरले. त्यानंतर रविवारी सपनाने पत्रकार परिषद घेऊन हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर सध्या पसरवला जाणारा माझा फोटो खूप जुना आहे. एवढेच नव्हे, तर ज्या सोशल मीडिया अकाउंटवरून मी काँग्रेस जॉइन केल्याचे म्हटले जात आहे तो माझा नाही. मुळातच मी ट्विटरवर नाही असा धक्कादायक खुलासा सपना चौधरीने केला आहे. याबरोबरच, ट्विटरवर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल स्वागत करणारे काँग्रेस नेते राज बब्बर यांना आपण कधीच भेटलो नाही असेही सपनाने म्हटले आहे.

सपना चौधरीने ट्वीट करून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे जाहीर केले असे शनिवारी दाखवण्यात आले. प्रत्यक्षात तो ट्विटर अकाउंट सपनाचा नसून तिचा फॅन पेज आहे. आपण ट्विटरवरच नाही, अशात ट्वीट करणार कसे? असा सवाल सपनाने उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिला काँग्रेसकडून खासदारकीचे तिकीट मिळणार असेही वृत्त आले होते. परंतु, आपण कुठलाही राजकीय पक्ष जॉइन करणे तर दूर निवडणुकीत प्रचार सुद्धा करणार नाही. कारण या सर्व गोष्टींपासून आपल्याला दूरच राहायचे आहे असे सपनाने सांगितले आहे.