|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पोलीस असल्याचे सांगत दागिने लंपास

पोलीस असल्याचे सांगत दागिने लंपास 

काकडवाडी-मिरज मार्गावरील घटना : अडीच तोळ्यांचे दागिने पळवले

प्रतिनिधी/ सांगली

‘आम्ही पोलीस आहोत, तानंग फाटय़ाजवळ एकाला लुटले आहे. तुम्ही सोने घालून फिरु नका’, असे सांगत एकाचे अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरटय़ांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. काकडवाडी ते मिरज रस्त्यावर मुळे मळा येथे सकाळ ही घटना घडली. याबाबात आकाराम निवृत्ती पाटील (वय 58, रा. काकडवाडी, ता. मिरज) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, काकडवाडी (ता. मिरज) येथील आकाराम पाटील हे त्यांचे शेत नांगरण्यासाठी ट्रक्टर सांगण्यासाठी मुळे मळा येथे गेले होते. त्यांच्या गळ्यात एक सोन्याची चेन व हातामध्ये दोन अंगठय़ा असे अडीच तोळे सोन्याचे दागिने होते. पाटील मुळे मळा येथे थांबले असताना मोटारसायकल वरुन दोघे जण तिथे आले. त्यांनी पोलीस असल्याचे सांगत तानंग फाटय़ाजवळ एकाला लुटण्यात आले आहे. तुम्ही गळ्यात ऐवढे सोने घालून कुठे फिरताय असे विचारत सोन्याचे दागिने एका बॅगमध्ये काढून ठेवण्यास सांगितले.

दोघांच्या कपडे तसेच बोलण्यावरुन ते पोलीस असल्याचे पाटील यांना पटल्याने त्यांनी दागिने काढून एका बॅगमध्ये ठेवले. ती बँग मोटारसायकलच्या डिकीत ठेवत असताना दोघांनी हातचलाखीने दागिने लंपास केले. घरी गेल्यानंतर बॅग उघडून पाहिल्यानंतर पाटील यांच्या चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपसिंग गिल यांच्यासह सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. हा गुन्हा मिरज ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत घडल्याने तो मिरज ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलिसांनी दिली.