|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज 

प्रतिनिधी/ बेळगाव

लोकसभा निवडणूक मंगळवार दि. 23 रोजी होत आहे. या निवडणुकीची सर्व ती तयारी पूर्ण झाली असून ही निवडणूक शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी आर. विशाल यांनी दिली आहे.

जिह्यामध्ये एकूण 37 लाख 73 हजार 990 मतदार आहेत. त्यामध्ये 19 लाख 10 हजार 731 पुरुष तर 18 लाख 63 हजार 133 महिला मतदार आहेत तर इतर 126 मतदार असल्याची माहिती देण्यात आली. मतदानासाठी एकूण 4 हजार 434 मतदान केंदे स्थापन करण्यात आली आहेत. एकूण या निवडणुकीसाठी 35 हजार कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली असून ते आपले काम चोखपणे पार पाडत आहेत.

जिह्यामध्ये एकूण 24 हजार 918 दिव्यांग मतदार आहेत तर 18 हजार 743 नोकरदार मतदार आहेत. या दोघांसाठी सर्व ती उपाय योजना करण्यात आली आहे. दिव्यांगांना ने-आण करण्यासाठी वाहनांची सोय देखील करण्यात आली आहे. ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्व ती तयारी पूर्ण झाली आहे. मतदाना दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात येणार आहेत. 108 भरारी पथके, 56 निरीक्षक तसेच इतर अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.

अंध तसेच इतर मतदारांसाठी ब्रेलडमी बॅलेटपेपर तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अंध किंवा दिव्यांगांना ने-आण करण्यासाठी 18 वयापेक्षा कमी असलेल्या मुलांची नेमणूक करण्यात आली आहे.

मतदानासाठी ही ओळखपत्रे चालतील

मतदाराकडे मतदान कार्ड नसले तरी त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट, केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये नोकरी करत असाल तर त्याचे ओळखपत्र, पोस्टाचे खाते, बँक खाते, पॅनकार्ड, आधारकार्ड, उद्योग खात्रीमध्ये काम करत असल्यास स्मार्ट कार्ड, विमा कार्ड, पेन्शन कार्ड, आधारकार्ड ही सर्व ओळखपत्रे मतदान करण्यास चालू शकतात.

मोबाईलवर बंदी

मतदान केंद्रांमध्ये मोबाईलवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून मतदान करतानाही मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेता येणार नाही. तेंव्हा मतदारांनी आपला मोबाईल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे कळविण्यात आले आहे. मतदान केंद्रांपासून  100 मीटरपर्यंत कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करता येणार नाही. 23 एप्रिल रोजी मतदान असल्यामुळे रविवार दि. 21 रोजी सायंकाळपासून मद्य विक्री पूर्णपणे बंद राहिल. 23 एप्रिल मध्यरात्रीपर्यंत ही दुकाने बंद राहतील, असे कळविण्यात आले.