|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडय़ात मगोची भव्य पदयात्रा

फोंडय़ात मगोची भव्य पदयात्रा 

प्रतिनिधी/ फोंडा

केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी फोंडय़ातील जाहीर सभेत म. गो. पक्षाविरोधात जे वक्तव्य केले होते, त्याचा निषेध म्हणून म. गो. पक्षातर्फे काल रविवारी सकाळी फोंडा शहरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. म. गो. नेते सुदिन ढवळीकर यांच्या नेतृत्त्वाखाली काढलेल्या या पदयात्रेत भाजपाविरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच लोकसभा निवडणुकीत म. गो. प्रेमींनी भाजपाविरोधात मतदान करण्याचे आवाहनही करण्यात आले.

 वारखंडे येथील मारुती मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाले. जुने बसस्थानक, वरचा बाजार, शांतीनगर, सांताक्रूझ तिस्क या मार्गावरुन निघालेल्या पदयात्रीची सांगता आगियार मैदानावर झाली. पक्षकार्यकर्ते व समर्थकांना संबोधित करताना सुदिन ढवळीकर म्हणाले, म. गो. पक्ष हा गोमंतकीयांचा व येथील बहुजनांचा पक्ष आहे. तो संपवून टाकण्याचे केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी केलेले विधान  निषेधार्ह आहे. त्याबद्दल गडकरी यांनी समस्त गोमंतकीयांची माफी मागावी.

गडकरींचा बोलवता धनी वेळगा

 म. गो. पक्षाला गोव्यात मोठा इतिहास आहे. म. गो.च्या हाताला धरुनच भाजपा गोव्यात रुजला. मात्र भाजपाचे नेते हा पक्ष संपविण्याची जी भाषा करीत आहेत, ती भाजपाला अधोगतीकडे घेऊन जाणार आहे. नितीन गडकरी यांचे मांद्रेच्या सभेतील भाषण व फोंडय़ातील भाषणामध्ये विसंगती आहे. फोंडय़ात गडकरी यांनी  ढवळीकर कुटुंबियांवर जी गरळ ओकली, त्यामागील बोलवता धनी वेगळाच आहे, असा आरोप सुदिन ढवळीकर यांनी केला. म. गो. पक्षाला नवचैतन्य देण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी पुढे येण्याची हाकही त्यांनी दिली.

 यावेळी डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ, अभय प्रभू, डॉ. केतन भाटीकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. महिला व युवा कार्यकर्ते मोठय़ासंख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते.