|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मुरगनला पलायन करण्यासाठी सहकैद्यांनीच केली मदत

मुरगनला पलायन करण्यासाठी सहकैद्यांनीच केली मदत 

प्रतिनिधी/ बेळगाव

खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱया एका कैद्याने हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतीवरुन उडी टाकून सोमवारी रात्री पलायन केले आहे. या कैद्याच्या पलायनासाठी कारागृहातील सहकैद्यांनीच त्याला मदत केल्याची माहिती उघडकीस आली असून या संबंधी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार कैद्याचा शोध घेत आहेत.

मुरगन उर्फ मुरगा (वय 51) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा पेरीयारनगर शेलम येथील राहणारा आहे. सोमवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास कारागृहातील हॉस्पिटलजवळील भिंतीवरुन उडी टाकून त्याने पलायन केले. याचवेळी बेंगळूर येथील सलीम अब्दुलखैम (वय 33) या सहकैद्यानेही कारागृहातून पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला यश आले नाही.

 या दोघा जणांना मुबारक उर्फ बतीस्टा महम्मददस्तगीर (वय 29, रा. इस्लामपूर), करुणाकर पटाळी (वय 45, रा. सुळय़ा) यांनी पलायन करण्यासाठी मदत केली आहे. आधी सहकैद्यांबरोबर चर्चा करुनच मुरगनने जेलब्रेकची योजना आखली. कारागृहाच्या आतील बाजूच्या भिंतीस असलेल्या पाईपच्या साहाय्याने त्याने भिंतीवर चढल्याचे उघडकीस आले आहे. त्यासाठी बेडशीट, पॅन्ट, दोरीचा त्याने वापर केला आहे.

कारागृहाचे मुख्य अधीक्षक टी. पी. शेष यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. हिंडलगा मध्यवर्ती कारागृह संपूर्ण राज्यात सुरक्षित कारागृह मानले जाते. बेंगळूर येथील परप्पनअग्रहारनंतर हे कारागृह सुरक्षित आहे. परंतु येथे या पूर्वीही जेलब्रेकच्या अनेक घटना घडल्या आहेत.

सहकैद्यांबरोबर कट रचूनच मुरगनने कारागृहातून पलायन केले आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येत आहे. मुरगन हा खून प्रकरणात जन्मठेपेची  शिक्षा भोगणारा कैदी आहे. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत पोलीस व कारागृह अधिकाऱयांनी मुरगनसाठी सर्वत्र शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. मंगळवारी मतदानाचा दिवस होता. त्यामुळे पोलीस निवडणूक बंदोबस्तात व्यस्त होते. आता बुधवारपासून या प्रकरणाच्या तपासाला गती येणार आहे.