केंद्र सरकारची माहिती – मात्र सावधगिरी बाळगण्याची सूचना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जगभरात चिंतेचा विषय बनलेल्या कोरोनाच्या नवीन प्रकाराचा एकही रुग्ण भारतात आतापर्यंत समोर आलेला नाही. ‘बी.1.1529’ नावाचा हा व्हेरिएंट देशभरातील चाचणी प्रयोगशाळांमध्ये पाठवलेल्या कोणत्याही नमुन्यात आढळला नसल्याने भारताला सध्यातरी दिलासा मिळाला आहे. मात्र, या व्हेरिएंटपासून असलेला धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून येणाऱया प्रवाशांची तपासणी करण्यासाठी सर्व विमानतळांवर सूचना जारी केल्या आहेत.
केंद्र सरकारने राज्यांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त बैठकीत बोलताना आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना सूचना केल्या. भारताच्या राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने सरकारला ह्या विषाणूबद्दलची माहिती दिली आहे. हा विषाणू वेगाने प्रसार होणारा असून यामुळे सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे सर्व राज्यांनी या भागातून येणाऱया प्रवाशांची काटेकोरपणे आणि आरोग्य मंत्रालयाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन तपासणी करावी, असे निर्देश जारी केले आहेत. या विषाणूचे बोत्सवानामध्ये 3, दक्षिण आफ्रिकेत 6 तर हाँगकाँगमध्ये 1 रुग्ण आढळला आहे. या संसर्गवाढीमुळेच आता केंद्र सरकारने सावध होत इतर देशातून येणाऱया प्रवाशांची काटेकोरपणे तपासणी करण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेत मोठय़ा प्रमाणात संसर्गाला कारणीभूत ठरलेला अधिक धोकादायक कोरोना व्हेरिएंट इस्राईलमध्ये सापडला आहे. इस्राईलमध्ये नव्या विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण मलावीमधून परतला होता. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवानानंतर आता कोरोनाचा ‘बी.1.1529’ हा व्हेरिएंट आता आपल्या देशातही पोहोचल्याची माहिती इस्राईलच्या आरोग्य विभागाने दिली आहे. अन्य 2 प्रवाशांमध्येही या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग आढळला आहे. त्यांना सध्या क्वारंटाईन करण्यात आले आहे. इस्राईलमध्ये संसर्ग झालेल्या तीनही रुग्णांचे लसीकरण झाल्याची बाब चौकशीअंती पुढे आली आहे.
डेल्टा व्हेरिएंटपेक्षा घातक
‘बी.1.1529’ हा नवा व्हेरिएंट याआधी जगभरात धोकादायक समजल्या गेलेल्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा घातक असल्याचे दिसून येत आहे. डेल्टा व्हेरिएंटमध्ये दोन म्युटेशन झाले होते. मात्र, या व्हेरिएंटमध्ये तब्बल 10 म्युटेशन झालेले आहे. त्यामुळे याची संसर्ग क्षमता वाढली आहे. कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळल्याने तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
‘डब्ल्यूएचओ’ची तातडीची बैठक
दक्षिण आफ्रिकेतून बोत्सवाना आणि हाँगकाँगमध्ये आलेल्या नागरिकांनाही या नवीन प्रकाराच्या संसर्गासारखी लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेने यासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेशी (डब्ल्यूएचओ) संपर्क साधत तातडीची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. त्यानुसार डब्ल्यूएचओने या नव्या व्हेरिएंटचा अभ्यास करून सर्व देशांना सतर्क करण्यासाठी तातडीची नियमावली बनविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.