पाकिस्तानचा दावा : भारताला काउंसिलर एक्सेसची संधी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कारागृहात बंद असलेले भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून दिलासा मिळूनही जाधव यांनी दया याचिकेवर पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
पाकिस्तानने दुसऱयांदा कुलभूषण जाधव प्रकरणात काउंसिलर एक्सेस देण्याचा प्रस्ताव भारताला पाठवला आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील भारतीय दुतावास अधिकाऱयांना कुलभूषण यांना भेटण्याची अनुमती मिळू शकते. याशिवाय जाधव यांचे वडील आणि पत्नीला भेटण्याची परवानगी दिली आहे. जाधव यांना 17 जूनला फेरविचार याचिका दाखल करण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी नकार दिला असून याबाबत भारतीय उच्चायोगाला लिखित सूचना दिल्याचे पाकिस्तानी अधिकाऱयांचे म्हणणे आहे. आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर करत त्यांनी आपल्या शिक्षेवर पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून कुलभूषण जाधव हे पाकिस्तानमधील तुरूंगात आहेत. एप्रिल 2017 मध्ये पाकिस्तानी लष्कराच्या न्यायालयाने हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. या निर्णयाविरोधात भारताने हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती.