तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
भीमानदीकाठी मोठया प्रमाणावर गाढवावरून वाळू वाहतुक होते. पोलिसांनी अनेकवेळा वाळूचोरांवर कारवाई केली. तरी देखिल गाढवावरून होणारी वाहतुक बंद झाली नाही. सरतेशेवटी चक्क पोलिसांनी वाळूवाहतुक करणारी गाढवचं जप्त केली. आता हीच जप्त केलेली 36 गाढवं चक्क येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने उटी येथील ऍनिमल कोंडवाडयात निघाली आहेत.
येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी संबधित गाढवांना कोंडवाडयात पाठवण्यांचे आदेश केले. पण महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचा कोंडवाडा नाही. त्यामुळे तामिळनाडू राज्यातील निलगिरी अर्थात उटी येथील इंडिया प्रोजेक्ट फॉर ऍनिमल ऍण्ड नेचर संस्था यांच्याकडे ट्रकने पाठवून देण्यात आली आहेत.
वाळू वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई
एकीकडे वाळू वाहतुक केलेली गाढवं कोर्टाच्या आदेशाने उटीला निघत असताना. दुसरीकडे तालुक्यातील सिध्देवाडी येथील एका नविन बिगर नंबरच्या टेम्पोमधून वाळू वाहतुक होत असताना पोलिसांना आढळली. याबाबत वाहनचालक सुनिल सातपुते यांच्यावर या वाहनांच्या चेसी नंबरवरून एमएच 13 डिक्यू 0140 या नंबरच्या वाहनाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.