प्रतिनिधी/ सातारा :
चिंचणेर वंदन, ता. सातारा येथील कृष्णा नदीच्या पात्रात विनापरवाना वाळू उपसा करणाऱया जगन्नाथ आण्णा पवार (वय 50 रा. चिंचणेर) यांच्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यानुसार 10 ब्रास वाळू जप्त करण्यात आली असल्याची माहिती चिंचणेरचे तलाठी जे. डी. कमलाकर यांनी दिली.
दि. 18 रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास तलाठी कमलाकर यांना बेकायदा वाळू उपसा होत असल्याची माहिती समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी तिथे वाळू उत्खन्नन करत असलेले जगन्नाथ पवार आढळून आले. यावेळी तलाठी कमलाकर यांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडील वाळू चाळणीच्या जाळय़ा जप्त करत तिथे काढण्यात आलेली 10 ब्रास वाळू जप्त केले असल्याचे सांगितले. दरम्यान, यासंदर्भात तहसीलदार आशा होळकर यांना केलेला पंचनामा सादर करण्यात आला असून पुढील कारवाई त्यांच्या आदेशानुसार होणार असल्याचे कमलाकर यांनी सांगितले. गावात महसूल कर्मचाऱयांना दमदाटी झाली असल्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी असा काही प्रकार घडला नसल्याचे सांगितले.
एकीकडे लॉकडाऊन कडकपणे पाळा असे आवाहन प्रशासन करत आहे. तर दुसरीकडे गौन खनिज संपत्ती लूटणारे बेताल होताहेत. शनिवारी सकाळी चिंचणेर येथे कृष्णा नदीच्या पात्रात विनापरवाना वाळू उपसा सुरू होता. नदीपात्रातून काढलेल्या वाळूचे ढीग तेथे लावण्यात आलेले होते. मात्र, तिथे काम करणाऱया मजूर जगन्नाथ पवार यांच्यावर कारवाई करण्यात आली असली तर ते ज्यांच्यासाठी काम करत होते त्यांची नावे मात्र काय कारवाईत पुढे आली नाहीत. उलट पवार ज्यांच्यासाठी काम करत होते त्यांना या कारवाईतून वगळण्यात आले असल्याची माहिती लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कृती समितीचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी तरुण भारतशी बोलताना दिली. वाळू चोरी करणारी गावातीलच कंपनी कारवाई करण्यास गेले असताना उलट पोलीस पाटील, तलाठय़ांना धमक्या देत होते. त्यांची नावेही उपलब्ध असून यासंदर्भात आपण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात असल्याचेही उमेश चव्हाण यांनी सांगितले.