ऑनलाईन टीम / काठमांडू :
नेपाळच्या नवीन नकाशाला मान्यता देण्यासाठी नेपाळ संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आज फायनल मतदान घेण्यात येणार आहे. शनिवारी या नवीन नकाशाच्या मंजुरीसाठी नेपाळ सरकारने प्रस्तावित केलेल्या घटनात्मक दुरुस्ती विधेयकाला कनिष्ठ सभागृहात मंजुरी मिळाली. आज वरिष्ठ सभागृहात या विधेयकाला मंजुरी मिळाल्यास त्याचे अधिकृत कायद्यात रूपांतर करण्यासाठी हे विधेयक राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येईल.
भारत आणि नेपाळमध्ये लिपुलेख, लिम्पियाधुरा, कालापानी या तीन भागांच्या सीमेवरून वाद आहेत. काही दिवसांपूर्वीच हे तिन्ही भाग नेपाळने आपल्या नकाशात दाखवले होते. त्यानंतर राजकीय नकाशा सादर केला. या नकाशाच्या मंजुरीसाठी नेपाळच्या के. पी. शर्मा ओली सरकारने घटनादुरुस्तीचा प्रस्ताव नेपाळी संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये सादर केला होता.
नेपाळच्या संसदेत 275 सदस्य आहेत. त्यापैकी 258 जणांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले होते. कनिष्ठ सभागृहात मंजूर झालेले हे विधेयक आज वरिष्ठ सभागृहात मंजुरीसाठी दाखल केले जाईल. तिथे हे विधेयक मंजूर झाल्यास ते राष्ट्रपती बिंधिया देवी भंडारी यांच्याकडे पाठवले जाईल. यानंतर त्याचा घटनेत समावेश होणार आहे.