ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाबाधित रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे अशा रुग्णालयावर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा दुसरा टप्पा प्रभावीपणे राबवून कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याचे निर्देश दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ‘कोविड-19’ विषाणू प्रादुर्भाव निमूर्लन आढावा बैठक पार पडली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, जिल्ह्यातील काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर आहेत. तथापि, ती रुग्णालये पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी. केंद्रीय पथकाच्या इशाऱ्यानुसार कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने सतर्क राहून कोरोना विषाणूचा संक्रमण होणार नाही, या अनुषंगाने नियोजन करावे.
तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहिम आपण हाती घेतलेली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अधिक प्रभावीपणे राबवावा. मृत्यदर कमी करण्याबाबत सूक्ष्म नियोजन करुन मृत्यदर शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावे, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणाकाळात नागरिक घराबाहेर पडल्यास कोरोना विषाणूचे संसर्ग वाढण्याची शक्यता विचारात घेऊन प्रशासनाने सतर्क राहून कामकाज करावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.