प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या महात्मा फुले भाजी मार्केटमधील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. याचदरम्यान येथील गाळेधारकांनी जेएमएफसी न्यायालयात धाव घेऊन गाळय़ांचा ताबा असल्याचे सांगून लिलाव प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र सदर दावा न्यायालयाने फेटाळला आहे.
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळय़ांच्या माध्यमांतून महसूल मिळतो. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा फुले भाजी मार्केटमधील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. सदर गाळय़ांच्या भाडेकराराची मुदत संपल्याने फेरलिलाव करण्यासाठी महापालिकेने गाळेधारकांना नोटीस बजावून थकीत भाडे भरण्याची सूचना केली होती. तसेच गाळे रिकामे करण्याची सूचना केली होती. मात्र गाळेधारकांनी भाडे भरण्यास टाळाटाळ करून गाळे रिकामे करण्यासदेखील चालढकल चालविली होती. गाळेधारकांनी भाडे भरले नसल्याने गाळेधारकांना हटविले होते. तसेच महापालिकेच्या महसूल विभागाने महात्मा फुले भाजी मार्केटचे प्रवेशद्वार बंद करून संपूर्ण मार्केटचा ताबा घेतला होता.
त्यानंतर गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविली होती. मात्र याचदरम्यान महात्मा फुले भाजी मार्केटमधील 28 गाळेधारकांनी जेएमएफसी न्यायालयात धाव घेऊन गाळय़ांचा ताबा आपल्याकडे असल्याचे दाखवून लिलाव प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी केली होती. बेकायदेशीर लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी अंतरिम अर्जाद्वारे केली होती. मात्र त्यावेळी न्यायालयाने अंतरिम अर्ज फेटाळला होता. त्यामुळे महापालिकेने लिलाव प्रक्रिया राबविली होती. सदर याचिकेची सुनावणी नुकतीच झाली असून याचिकेतील फिर्यादी न्यायालयात हजर राहिले नसल्याने ही याचिका फेटाळली असल्याची माहिती महापालिकेचे कायदा सल्लागार यु. डी. महांतशेट्टी यांनी दिली..