मडगाव पालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर : मावळलेल्या मंडळातील 10 नगरसेवकांना फटका, आरक्षणात राजकीय हस्तक्षेप झाल्याच्या टीकेला जोर
प्रसाद नागवेकर / मडगाव
मडगाव पालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची घोषणा शुक्रवारी करण्यात आल्यानंतर मावळलेल्या मंडळातील कित्येक नगरसेवकांबरोबर अनेक इच्छुकांचे पत्ते कापले गेले आहेत. त्यात मावळलेल्या मंडळातील 10 नगरसेवकांना निवडणूक न लढविता घरी बसावे लागणार आहे अन्यथा अन्य प्रभागांतून आपले नशीब आजमावे लागणार आहे.
मावळलेल्या मंडळातील नगरसेवकांमधील फातोर्डा मतदारसंघातील प्रभागांवर नजर फिरविल्यास प्रभाग 2 हा इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित झाल्याने या प्रभागाचे मावळलेले नगरसेवक लिंडन पेरेरा यांना येथून निवडणूक लढविणे शक्मय होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर प्रभाग 6 मधून निवडून आल्यानंतर 4 वर्षे नगराध्यक्षपद भूषविलेल्या डॉ. बबिता आंगले प्रभुदेसाई यांचा सदर प्रभाग इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित झाल्याने त्यांचा पत्ता काटण्यात आला आहे. सदर प्रभागातून माजी उपनगराध्यक्षा बबिता नाईक यांनी निवडणूक लढविण्याची तयारी चालविली होती. इतर मागासवर्गीय असल्याने हा प्रभाग त्यांच्यासाठी अनुकूल असला, तरी त्या मागील वेळेप्रमाणे प्रभाग 25 मधून उतरण्याची शक्मयता आहे. हा प्रभाग महिलांसाठी राखीव आहे. बबिता यांचे पती सदानंद नाईक हे प्रभाग 25 मधून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करत होते. ते आता इतर मागासवर्गीयांसाठी राखीव प्रभाग 6 तून निवडणूक लढविणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रभाग 25 महिलांसाठी राखीव झाल्याने या प्रभागाचे मावळलेले नगरसेवक कुतबुद्दीन बागेवाडी हे निवडणूक लढविण्यापासून वंचित झाले आहेत.
प्रभाग 11 अडीच दशकानंतर महिलांसाठी राखीव
प्रभाग 7 हा अनुसूचित जमातींतील महिलांसाठी राखीव झाल्याने मावळलेले नगरसेवक जुझे फर्नांडिस यांना येथून निवडणूक लढविणे शक्मय होणार नाही. तसेच प्रभाग 11 महिलांसाठी राखीव करण्यात आल्याने मावळलेले नगरसेवक आंजेलिस पेरेरा यांचा पत्ता गुल झाला आहे. हा प्रभाग जवळपास अडीच दशकानंतर महिलांसाठी राखीव झाला आहे याची नोंद घेणे तेवढेच आवश्यक आहे. या प्रभागातून सलग तीन वेळा नगरसेवक बनलेले व मागील निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेले माजी उपनगराध्यक्ष राजू नाईक हे यंदा पुन्हा निवडणुकीसाठी तयार होते. मात्र आता आपण आपल्या मुलीला रिंगणात उतरविणार असल्याचे नाईक यांनी या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.
मडगाव मतदारसंघातील प्रभागांची स्थिती
यानंतर मडगाव मतदारसंघातील प्रभाग आरक्षणाकडे नजर टाकल्यास प्रभाग 16 हा इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मावळलेले नगरसेवक मनोज मसूरकर यांना येथून निवडणूक लढविणे शक्मय होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने ते अन्य सोयीस्कर प्रभागातून निवडणूक लढविण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. प्रभाग 19 हा इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने मावळलेले नगरसेवक अविनाश शिरोडकर यांची यंदा या प्रभागातून निवडणूक लढविण्याच्या बाबतीत गोची झाली आहे.
याचप्रकारे प्रभाग 20 महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने मावळलेले नगरसेवक जाफर बुदानी यांना येथून निवडणुक लढविणे शक्मय नसून या प्रभागाचे तीन वेळा प्रतिनिधीत्व केलेले व मागील निवडणुकीत पराभूत झालेले शॅडो कौन्सिल फॉर मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्हो निवडणूक लढवू शकणार नाहीत. याबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणली असता ते म्हणाले की, आपली पालिका निवडणूक लढविण्याची यंदा तयारी नव्हती. आपल्याला आरक्षणाबाबतच्या फेरफाराची आधीच जाणीव होती. तरी असता शॅडो कौन्सिल फक्त प्रभाग 20 च नव्हे, तर कित्येक प्रभागांतून चांगले उमेदवार निवडणुकीत उतरविणार असल्याची माहिती त्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
कुडतरीतील तिन्ही प्रभाग महिलांसाठी राखीव
यानंतर कुडतरी मतदारसंघात येणारे 23, 24 व 25 हे तिन्ही प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने प्रभाग 24 मधून राजू उर्फ हेडली शिरोडकर, तर 25 मधून कुतबुद्दीन बागेवाडी या मावळलेल्या नगरसेवकांना या प्रभागांतून निवडणूक लढविण्याच्या बाबतीत चपराक बसली आहे.
मावळलेल्या 15 नगरसेवकांना पुन्हा नशीब आजमावण्याची संधी
सुमारे 10 मावळलेल्या नगरसेवकांवर राखीवतेमुळे निवडणूक लढविण्याच्या बाबतीत गदा आली असली, तरी तब्बल 15 मावळलेले नगरसेवक पुन्हा आपले नशीब आजमावू शकणार आहेत. त्यात प्रभाग 1 क्लारा फर्नांडिस, प्रभाग 3 जिता क्रास्टो, प्रभाग 4 टेरेंस बार्बोझा, प्रभाग 5 पीटर फर्नांडिस, प्रभाग 8 टिटो कार्दोज, प्रभाग 9 पूजा नाईक, प्रभाग 10 ग्लेन आंद्राद, प्रभाग 12 सूचिता मळकर्णेकर, प्रभाग 13 केतन कुडतरकर, प्रभाग 14 दामोदर नाईक, प्रभाग 15 डॉरिस टेक्सेरा, प्रभाग 17 रूपेश महात्मे, प्रभाग 21 दीपा शिरोडकर, प्रभाग 22 आर्थुर डिसिल्वा, प्रभाग 23 सुगंधा बांदेकर यांचा समावेश आहे. मात्र मावळलेले नगरसेवक आर्थुर हे प्रभाग 22 ऐवजी फातोर्डातील प्रभाग 5 मधून निवडणूक लढविण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.
भाजप समर्थकांचा मार्ग सुकर
या प्रभाग आरक्षण यादीकडे नजर टाकल्यास भाजप पुरस्कृत पॅनलमधून निवडणूक लढविलेल्या अथवा नंतर भाजपाशी जवळीक साधलेल्या नगरसेवकांना विशेष फायदा होणार आहे. यात नगरसेवक महात्मे, कुडतरकर, आर्थुर, मळकर्णेकर, बांदेकर यांचा समावेश असून प्रभाग 14 मध्ये उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचे बंधू राजेंद्र आजगावकर तसेच प्रभाग 22 मधून भाई नायक यांचे चिरंजिव प्रणव नायक यांचा निवडणूक लढविण्यासाठी मार्ग सुकर राहील याची काळजी घेण्यात आली आहे.
दिगंबर कामत यांच्या मुलाला उतरविण्याच्या बेताला धक्का
प्रभाग-18 च्या मावळलेल्या नगरसेविका शरद प्रभुदेसाई यांचा प्रभाग मागील वेळी महिलांसाठी राखीव होता, तर यंदा इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित करण्यात आला आहे. स्थानिक आमदार दिगंबर कामत येथे ज्याला उमेदवारी देतात तो निवडून येत असतो. त्यांचा हा बालेकिल्ला म्हणून प्रचलित आहे. यावेळी आमदार कामत यांचे चिरंजिव योगीराज कामत हे या प्रभागातून पालिका निवडणूक लढवून राजकारणाचा श्रीगणेशा करणार हे निश्चित होते. या पार्श्वभूमीवर सलग दुसऱयांदा सदर प्रभाग आरक्षित ठेवण्यात आल्याचे दिसून येत असून हे आरक्षण करताना राजकीय हस्तक्षेप झाल्याचे सूर आतापासून उमटण्यास लागले आहेत. आरक्षणात राजकीय हस्तक्षेप झाल्याची टीका करून काही पक्षांनी या आरक्षणाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याची तयारी चालविली आहे.
प्रभाग | स्थिती |
1 | खुला |
2 | इतर मागासवर्गीयांसाठी राखीव |
3 | खुला |
4 | अनुसूचित जमातींसाठी राखीव |
5 | खुला |
6 | इतर मागासवर्गीयांसाठी राखीव |
7 | अनुसूचित जमातींतील महिलांसाठी राखीव |
8 | खुला |
9 | खुला |
10 | खुला |
11 | महिलांसाठी राखीव |
12 | खुला |
13 | खुला |
14 | खुला |
15 | खुला |
16 | इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव |
17 | खुला |
18 | इतर मागासवर्गीयांसाठी राखीव |
19 | इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव |
20 | महिलांसाठी राखीव |
21 | इतर मागासवर्गीयांसाठी राखीव |
22 | खुला |
23 | महिलांसाठी राखीव |
24 | महिलांसाठी राखीव |
25 | महिलांसाठी राखीव |