विटा/प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील विटा, आष्टा आणि पलूस नगरपालिकांवर प्रशासक राज आले आहे. या नगरपालिकांच्या सदस्य मंडळाची मुदत संपली असून अद्याप निवडणूका झालेल्या नसल्याने शासनाने या नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त केले आहेत. तर उर्वरीत तासगांव आणि इस्लामपूर नगरपालिकेतही पुढच्या आठवड्यात प्रशासक राज येणार आहे.
जिल्ह्यातील नगरपंचायतींवरही प्रशासक नेमण्यात आले आहेत. मात्र नगरपंचायत निवडणूकांची प्रक्रिया सुरू असल्याने लवकरच पदाधिकारी निवडी होतील. नगरपालिका निवडणूक प्रक्रिया अद्याप जाहीर झाली नसल्याने नगरपालिकेवर प्रशासक राज सुरू झाले आहे.
सांगली जिल्ह्यातील पाच नगरपालिकांची मुदत लवकरच संपत आहे. यातील विटा, पलूस आणि आष्टा नगरपालिकेच्या सदस्य मंडळाची मुदत संपली आहे. तर इस्लामपूर आणि तासगांव नगरपालिकांच्या सदस्य मंडळाची मुदत पुढच्या आठवड्यात संपत आहे. या नगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला कोरोनमुळे ब्रेक लागला आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप निवडणूक प्रक्रिया राबवण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदस्य मंडळाची मुदत संपताच या नगरपालिकांच्यावर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहेत. यासाठी शासनाने आदेश पारित केला आहे.
विट्यासाठी प्रांताधिकारी संतोष भोर, आष्टा नगरपालिकेत प्रांताधिकारी संपत खिलारी तर पलूस नगरपंचायतीसाठी मुख्याधिकारी सुमित जाधव हे प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. तर इस्लामपूर नगरपालिकेची मुदत ३ जानेवारी रोजी संपत आहे आणि तासगांव नगरपालिकेची मुदत २ जानेवारी रोजी संपत आहे. तासगांवला प्रांताधिकारी समिर शिंगटे तर इस्लामपूरला नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव सावळे हे प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.