ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू विभागातील किश्तवाड येथे हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात सुरक्षा दलांना यश आले. अब्दुल रशीद शाह असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक ग्रेनेड, एके-47 रायफलचे मॅगझीन आणि एके-47 ची 30 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून, दहशतवाद्याची चौकशी सुरू आहे.
शुक्रवारी जम्मू पोलिसांना किश्तवाड भागात दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या 52 बटालियनच्या 17-आरआर (राष्ट्रीय रायफल्स) संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली. या कारवाईदरम्यान या दहशतवाद्याला अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच या गटाच्या दोन दहशतवाद्यांनाही किश्तवाडमध्ये अटक करण्यात आली होती.