वाळपई / प्रतिनिधी
मेळावली सत्तरी येथील दिव्यांग लता गावकर याअंगणवाडी शिक्षिका याची बदली केपे याठिकाणी करण्यात आलेली आहे .यामुळे तिच्यावर मोठय़ा प्रमाणात अन्याय झाला असून सरकारला दिव्यांग महिलांचे काहीही पडलेले नाही. सुडाच्या राजकारणामुळे लता गावकर यांच्यावर अन्याय झालेला आहे . त्यामुळे तीची बदली त्वरित रद्द करावी अशा प्रकारची मागणी करीत आज गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो वाळपई मतदार संघ काँग्रेस गट समितीच्यावतीने वाळपई येथील बाल व महिला कल्याण कार्यालयासमोर निदर्शने केली.
सुमारे तीन तास चाललेल्या निदर्शनानंतर वाळपई बाल विकास अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर ते संपुष्टात आणण्यात आले .
मात्र प्रकल्प अधिकाऱयांची उडवाउडवीची उत्तरे यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. याबाबतची माहिती अशी की मेळावली येथील लता गावकर याची केपे येथे बदली करण्यात आलेली आहे .दोन दिवसापूर्वी बाल व महिला खात्याच्या संचालिका दिपाली नाईक यांनी लता गावकर याना कारणे दाखवा नोटीस बजावून सेवेतून बडतर्फ का केले जाऊ नये अशा प्रकारचा प्रश्न केला आहे. यासाठी उत्तर देण्यासाठी चार दिवसांची मुदत दिलेली आहे. त्याचे पडसाद आज येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या निदर्शनात पाहायला मिळाले. सकाळी बारा वाजता प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अध्यक्ष दशरथ मांदेकर रोशन देसाई कार्यकर्ते रणजीत राणे सरचिटणीस नंदकुमार कोपर्डेकर समितीचे कार्यकर्ते व माजी नगरसेवक आशिष काणेकर व इतरांची खास उपस्थिती होती. घोषणा देत सदरचे शिष्टमंडळ कार्यालयावर चालून जात असताना पोलिसांनी गेटवर त्यांना अडविले.यावेळी प्रतिमा कुतिन्हो व वाळपई उपनिरीक्षक करिष्मा परुळेकर यांच्यात बऱयाच प्रमाणात खडाजंगी पाहायला मिळाले.
यावेळी प्रतिमा कुतिन्हो यांनी लता गावकर याच्यावर मोठय़ा प्रमाणात अन्याय झाला असून यामागे सरकारचा निषक्रियता जबाबदार असल्याचा आरोप केला . जवळपास दीड तासाने शिष्टमंडळातील निवडक प्रतिनिधींना कार्यालयाच्या गेटकडे आणण्यात आले व त्यांच्याशी प्रकल्प अधिकारी ललिता प्रभू यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तर देऊ शकले नाही .यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठमोठय़ाने घोषणा देऊन यागोष्टीचा निषेध केला. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना कार्यालयात जाऊन प्रकल्प अधिकाऱयांची भेट द्यावी अशा प्रकारची आग्रही मागणी लावून धरली. मात्र ती अमान्य करण्यात आली .शेवटी निरीक्षक सागर एकोस्कर घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी केलेल्या चर्चेनंतर पाच जणांचे शिष्टमंडळ ललिता प्रभू यांना भेटण्यास गेले. यावेळी विचारलेल्या प्रश्नाला ललिता प्रभू या समर्पक उत्तर देऊ शकले नाही. यामुळे मोठमोठय़ाने घोषणा देत त्यांनी कार्यालयाबाहेर येऊन निषेध केला. जोपर्यंत लता गावकर यांची बदली रद्द होत नाही. तोपर्यंत कोणत्याही अवस्थेत आंदोलन बंद होणार नसल्याचा इशारा गट समितीचे अध्यक्ष दशरथ मांदेकर यांनी दिला आहे.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रतिमा कुतिन्हो यांनी सरकारला लता गावकर यांच्यावर मोठय़ा प्रमाणत अन्याय केल्याचा आरोप केला. एका अभाग्य व दिव्यांग अंगणवाडी सेविकेला केपे याठिकाणी बदली करून त्यांच्या कुटुंबासमोर अडचणी निर्माण करण्याचे कारस्थान यामागे याखात्याचे मंत्री विश्वजित राणे व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा हात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गटाचे अध्यक्ष दशरथ मांदेकर यांनी विश्वजित राणे सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला. तर महिला अध्यक्ष रोशन देसाई यांनी सरकार महिलांकडे दुजाभाव करीत असल्याचा आरोप केला. यावेळी मोठय़ा प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मध्यंतरी कार्यालयात जाण्यास पोलिसाकडून मज्जाव करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ अँड. प्रतिमा कुतिन्हो यांनी कार्यालयाच्या गेटला लाँक लावण्याचा प्रयत्न केला मात्र तो पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे अयशस्वी ठरला.