10 दिवसांहून अधिक युद्ध लांबल्यास रशिया कंगालीच्या उंबरठय़ावर
युक्रेनविरोधात रशियाच्या युद्धाचा मूळ उद्देश त्याला नाटोत सामील होण्यापासून रोखणे होते. परंतु हे युद्ध लांबल्यास रशियावर त्याचाच डाव उलटू शकतो. युद्ध 10 दिवसांहून अधिक लांबल्यास रशिया कंगालीच्या उंबरठय़ावर पोहोचणार आहे. ब्लादिमीर पुतीन यांना चर्चा करणे भाग पडणार आहे. रशियाला युक्रेनवर जलद कब्जा करता येईल असा गैरसमज होता असे एस्टोनियाचे माजी संरक्षणमंत्री रिहो टेरास यांनी म्हटले आहे.
रशियाला सध्या एकाचवेळी अनेक आघाडय़ांवर आव्हानांना सामोरे जावे लागतेय. एकीकडे युद्धावर दरदिनी 1.12 लाख कोटी रुपये खर्च होत आहेत, तर रशियाचे चलन सध्या 10 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. पाश्चिमात्य देशांनी रशियासाब्sात डॉलर-युरो-पाउंडमध्ये व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. अशा स्थितीत रुबलचे मूल्य अधिक खालावण्याची शक्यता आहे.
4 दिवसात 5 लाख कोटीचा खर्च
युद्ध सुरू होण्याच्या तीन आठवडय़ांपूर्वीच रशियाच्या कंपन्यांना नुकसान होण्यास सुरुवात झाली होती. तेथील शेअरबाजार 10 फेब्रुवारीपर्यंत 10 टक्क्यांपर्यंत कोसळला आहे. यामुळे रशियाच्या नोंदणीकृत कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागतेय. रशियाला युक्रेनवर हल्ल्याच्या केवळ 4 दिवसांमध्ये 5 लाख कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत.
रशियावर आर्थिक आघात
एका गुप्तचर अहवालानुसार पुतीन युक्रेनवर हल्ल्यानंतरही थांबणार नाहीत. नाटोत सामील होण्याचा विचार करत असलेले शेजारी देश फिनलंड आणि स्वीडनवरही रशिया हल्ला करू शकतो. दुसरीकडे युरोप आणि अमेरिकेकडून लादल्या जाणाऱया आर्थिक निर्बंधांमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला आघात बसण्यास सुरुवात झाली आहे.
युद्ध नेमके कशासाठी?
रशियातील प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर कंपनी डीएनएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी दमित्री एलेक्सयेव्ह यांनी हे युद्ध आम्हाला मागे लोटणार असून युद्धाची काय गरज होती हेच समजले नसल्याचे उद्गार काढले आहेत. तर उड्डाणांवर बंदी घालण्यात आल्याने रशियातील एअरलाइन्स एस7ने कंपनी कंगालीच्या दिशेने जात असल्याचे म्हटले आहे.
रशियाला गुंतवून ठेवण्याची योजना
युद्ध एक महिन्यापर्यंत लांबल्यास रशियाला फायदा कमी आणि नुकसान अधिक होणार आहे. कीव्ह आणि खार्कीव्हध्ये युक्रेनचा बचाव मजबूत रहावा म्हणून काही युरोपीय देशांनी शस्त्रास्त्रपुरवठा सुरू केला आहे. रशियाला अधिक दिवसांपर्यंत युद्धात गुंतवूक ठेवण्याचा युरोपचा प्रयत्न आहे. दुसरीकडे बदललेली स्थिती पाहता रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी रिझर्व्ह फोर्सला सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे.
युक्रेनला 1 अब्ज रुपयांची मदत
युक्रेनला रशियाच्या हल्ल्यांना सामोरे जाता यावे म्हणून युरोपीय देशांमध्ये सरकारसह सर्वसामान्य नागरिकही पुढे सरसावून मदत करत आहेत. युक्रेनची बँक ‘नॅशनल बँक ऑफ युक्रेनने मदतीसाठी 4 दिवसांपूर्वी एक विशेष खाते उघडले होते. या बहुचलनी खात्यात केवळ 4 दिवसांमध्ये 1 अब्ज रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. या रकमेतून युक्रेनचे सैन्य आता दारूगोळा, आणि अन्य आवश्यक सामग्री खरेदी करणार आहे. युक्रेनसाठी जमविण्यात आलेली मदतसामग्री त्याच्या दूतावासामार्फत युक्रेनच्या सैन्यापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. चेक प्रजासत्ताकमध्ये दोन ठिकाणी ही सामग्री एकत्रित करण्यात येत आहे.