14 हजाराचा माल हस्तगत, गुहागर पोलीस, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
प्रतिनिधी/ गुहागर
गुहागर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने अवैध गावठी दारू अड्डय़ांवर कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी अंजनवेल-वाघबीळ येथील जंगलात सुरू असलेला गावठी दारू अड्डा उद्ध्वस्त करत एकूण 14,100 रूपयांचा माल हस्तगत केला आहे.
प्रमोद राजाराम धामणस्कर (अंजनवेल, म्हातारखाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या गावठी दारू व्यावसायिकाचे नाव आहे. गुहागर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंजनवेल येथील जंगलात अवैधपणे गावठी दारू अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक किरणकुमार कदम, हेडकॉन्स्टेबल संतोष साळसकर, संतोष माने, आनंद पवार, उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निबंधक किरण पाटील यांनी धाड टाकून गावठी दारू बनवण्याचे रसायन, 10 लिटर गावठी दारू व इतर साहित्य असा एकूण 14,100 रूपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी प्रमोद धामणस्कर याच्यावर मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 (ई) (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे.