ऑनलाईन टीम / मुंबई :
पदवी अंतिम वर्षाची किंवा सत्राचे परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्यात यावी अशा सुधारित मार्गदर्शक सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केल्या आहेत. यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा न घेता पदवी देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णयाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. त्यामुळे सरकार आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
यूजीसीच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार किती वर्षातील अंतिम सत्रांच्या विद्यापीठ आणि उच्च शैक्षणिक संस्थांच्या परीक्षा या सप्टेंबरमध्ये घ्यायच्या आहेत. या परीक्षा ऑफलाईन, ऑनलाईन पद्धतीने किंवा संमिश्र पद्धतीने घेतल्या जाऊ शकतात.
अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने 29 एप्रिल रोजी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. यानुसार अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा जुलै महिन्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र राज्य सरकारने पारंपारिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय किंवा परीक्षा देऊन पदवी देण्याबाबतचा निर्णय घेतला. या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा निर्णय अद्याप झाला नव्हता. याबाबत अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थांची मान्यता घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार होता.
दरम्यान, देशातील कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जुलैमध्ये परीक्षा घेणे शक्य आहे का याबाबत विचार करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने हरियाणा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू आर सी कुहाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्या सूचना मंजूर करण्यात आल्या आहेत.