सकाळी 7 ते रात्री 8 दर्शन वेळ
प्रतिनिधी/कोल्हापूर
काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचे कमी होत चाललेले प्रमाण याची दखल घेऊन अंबाबाई व जोतिबा मंदिर सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत दर्शनासाठी खुले असणार आहे. त्यामुळे आता सलग 13 तास भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
याकाळात अंबाबाई उत्सवमूर्तीवर अभिषेकही करता येईल. गरुड मंडपात अभिषेकाची व्यवस्था केली आहे. वेळेची अंमलबजावणी मंगळवारपासून (दि. 29) केली जाणार आहे, असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी बैठकीत जाहीर केले.
देवस्थान समितीच्या अखत्यारित येणारे कॉमर्स कॉलेजजवळील दत्त भिक्षालिंग मंदिर, ओढÎावरील सिध्दीविनायक मंदिर, बिनखांबी गणेश मंदिर आणि त्र्यंबोली टेकडीवरील त्र्यंबोली मंदिरही सकाळी सात ते रात्री आठ या वेळेतच खुले राहील. दर्शनासाठी येताना सोबत धार्मिक विधीचे साहित्य अथवा हार आणण्यासाठी अद्यापही देवस्थान समितीकडून परवानगी देण्यात आलेली नाही. बैठकीला समिती सचिव विजय पोवार, सहसचिव शितल इंगवले, सदस्य शिवाजीराव जाधव व राजेंद्र जाधव उपस्थित होते.