अश्रफचे शानदार अर्धशतक
वृत्तसंस्था/ माऊंट माँगनुई
येथे सुरू असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत सोमवारी तिसऱया दिवशी यजमान पाकने फॉलोऑनची नामुष्की टाळण्यात यश मिळविले. पावसाच्या अडथळय़ामुळे बराच खेळ वाया गेला. न्यूझीलंडच्या 431 या धावसंख्येला प्रत्त्युत्तर देताना पाकचा पहिला डाव 239 धावांवर आटोपल्यावर न्यूझीलंडला पहिल्या डावात 192 धावांची आघाडी मिळाली.
पाकने 1 बाद 30 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली पण न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकच्या फलंदाजांना बचावात्मक पवित्र घ्यावा लागला. अबीद अली आणि नाईट वॉचमन मोहम्मद अब्बास या जोडीने 12 षटके खेळून काढल्यानंतर जेमिसनने अबीद अलीचा त्रिफळा उडविला. अबीद अलीने 3 चौकारांसह 25 धावा जमविल्या. मोहम्मद अब्बासला आपले खाते उघडण्यासाठी 37 चेंडू खेळावे लागले. नंतर बोल्टने मोहम्मद अब्बासला टेलरकरवी झेलबाद केले. त्याने 55 चेंडूत केवळ 5 धावा जमवित नाईटवॉचमनची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. साऊदीने अझहर अलीला 5 धावांवर तर त्यानंतर हॅरीस सोहेलला 3 धावांवर झेलबाद केले. साऊदीने पाकचे हे दोन फलंदाज एका षटकांत बाद केले. पाकची स्थिती यावेळी 43 षटकांत 5 बाद 52 अशी केविलवाणी झाली होती. वॅग्नरने फवाद आलमला 9 धावांवर झेलबाद केले. पाकचे 6 फलंदाज 80 धावांत तंबूत परतल्याने त्यांच्यावर फॉलोऑनची छाया दाट पसरली होती.
कर्णधार मोहम्मद रिझवान आणि फईम अश्रफ यांनी पाकचा डाव सावरताना सातव्या गडय़ासाठी 107 धावांची भागिदारी केली. चोरटी धाव घेण्याच्या नादात कर्णधार रिझवान सँटनरच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे धावचीत झाला. त्याने 142 चेंडूत 8 चौकारांसह 71 धावांचे योगदान दिले. बोल्टने यासीर शहाचा 4 धावांवर त्रिफळा उडविला. वॅग्नरने शाहीन आफ्रिदीला 6 धावांवर झेलबाद केले. पाकची स्थिती यावेळी 9 बाद 235 अशी होती. अश्रफच्या चिवट फलंदाजीमुळे सलग दुसऱया कसोटीत पाकला फॉलोऑन देण्याची न्यूझीलंडची संधी हुकली. शेवटच्या सत्रात रिझवान सातव्या गडय़ाच्या रूपात बाद झाला. अश्रफ तिसऱया दिवशीच्या खेळाच्या शेवटच्या षटकांत शेवटच्या गडय़ाच्या रूपात बाद झाला. जेमिसनने अश्रफला वॅटलिंगकरवी झेलबाद केले. अश्रफने 134 चेंडूत 1 षटकार आणि 15 चौकारांसह 91 धावा जमविल्या. त्याचे शतक 9 धावांनी हुकले. कसोटी क्रिकेटमधील अश्रफची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. न्यूझीलंडतर्फे जेमिसनने 3 तर साऊदी, बोल्ट आणि वॅग्नर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. पावसामुळे काही मिनिटांचा खेळ वाया गेला. चहापानापूर्वीच्या सत्रात अचानक पाऊस आणि गारपीट झाल्याने पंचांनी खेळ थांबविला होता.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड प. डाव सर्व बाद 431, पाक प. डाव 102.2 षटकांत सर्वबाद 239 (फईम अश्रफ 91, मोहम्मद रिझवान 71, अबीद अली 25, शान मसूद 10, जेमिसन 3-35, साऊदी 2-69, बोल्ट 2-71, वॅग्नर 2-50).