सावंतवाडी / प्रतिनिधी-
ग्रामीण भागात गावागावात सकाळी सात ते अकरा या नियोजित वेळेनंतर जर का दुकाने उघडी दिसल्यास त्या दुकानांवर आता थेट पोलीस पोहोचत आहेत. पोलिसांची शहरातील दुकानांवर नजर तर आहेच आता ग्रामीण भागातही पोलीस जाऊन कारवाई करत आहेत. सावंतवाडी पोलीस निरीक्षक मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस अधिकारी स्वाती यादव बाबर यांच्या टीमने आज मळगाव येथे किराणा मालाच्या तीन व एका बेकरी दुकानांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. तर सावंतवाडी शहरातील एका दुकानावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी दिवसभरात पाच दुकानांवर कारवाई झाली असून दहा जण विना मास फिरताना आढळले आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुका कोरोना पॉझिटीव्ह आणि मृत्यूदराच्या बाबतीत हिटलिस्टवर आहे. त्यामुळे तालुक्याकडे आता पोलीस, महसूल व आरोग्य विभागाने शहराबरोबरच ग्रामीण भागातही आपली नजर वळवली आहे.