श्रीपूर / प्रतिनिधी
अकलूज उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी स्वच्छ व उत्साहवर्धक वातावरणात कोविशिल्ड लसीकरणाचा प्रारंभ डॉ. मनिषा कदम-शिंदे यांना लस टोचून करण्यात आला. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन प्रांताधिकारी शमा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
पहिल्या टप्प्यात १७९० डोज उपलब्ध झाले असून, तालुक्यातीत डॉक्टर्स व आरोग्य सेवा देणाऱ्या संबंधित कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी कोविन ॲपवर यादी संकलित करण्यात आली आहे. लसीकरणासाठी ३२५४ जणांनी कोविन ॲपवर नाव नोंदणी केली आहे. आरोग्य सेवेशी संबंधित रोज १०० जणांना लस देण्यात येणार आहे. लसीकरण केंद्रावर लस सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० यावेळेत देण्यात येणार आहे. या कामासाठी ५ आरोग्यसेविकांचे पथक नेमण्यात आले आहे. लसीकरणाबाबत त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे.
लस घेतलेल्यांना निरीक्षणाखाली ठेवून कोणता त्रास झाला नाही, याची काळजी घेऊन घरी पाठविण्यात आले. अचानक कोणता त्रास होत असेल, तर वैद्यकीय पथक आणि त्यासाठी ऍम्ब्युलन्स सेवा देखील तयार ठेवण्यात आली होती. यावेळी लस घेतलेल्या अनेक जणांना कोणताही त्रास जाणवल्याचे दिसले नाही. ही एक लस घेतले म्हणजे झाले, असे नाही. तर आणखी एक लस 28 दिवसांनी घ्यावी लागेल आणि मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवणे ही पथ्ये पाळावीच लागतील. याशिवाय पूर्ण सुरक्षितता मिळणार नाही.
यावेळी लसीकरणाच्या प्रारंभ प्रसंगी जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अनिरूध्द पिंपळे, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक भाग्यश्री म्हेत्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ. सुप्रिया खडतरे, सुप्रसिध्द डॉ. एम. के. इनामदार, आयएमएचे तालुकाध्यक्ष डॉ. नितीन एकतपुरे, आयएमएचे सचिव डॉ. संतोष खडतरे, डॉ. सुरेश सुर्यवंशी, डॉ. प्रविण शिंदे, डॉ. अतुत फडे, डॉ. व्होरा, डॉ. शहा, लसीकरण केंद्राच्या इन्चार्ज एस. डी. काकुळे, परिचारीका केंजळे, भालेराव, निलेश कदम यांच्यासह अकलूजमधील आरोग्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.