पियुष जैननंतर आता पुष्पराज ठरले टार्गेट: राज्यात 50 ठिकाणी छापेमारी
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमध्ये प्राप्तिकर विभागाकडून छापासत्र सुरूच असून सध्या अत्तर व्यापारी आणि शेकडो कोटींच्या घबाडाची जोरदार चर्चा सुरू आहे. पियुष जैन या अत्तर व्यापाऱयावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 257 कोटींचे घबाड सापडल्यानंतर आता पुष्पराज जैन उर्फ ‘पंपी’ यांच्या विविध मालमत्तांवर शुक्रवारी छापे टाकण्यात आले. पुष्पराज जैन यांच्याबरोबरच राज्यात 50 हून अधिक ठिकाणी प्राप्तिकर अधिकाऱयांनी (आयटी) एकाच वेळी छापे टाकले. ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे.
शुक्रवारी सकाळी 7 वाजता प्राप्तिकर अधिकारी पुष्पराज जैन यांच्या कन्नौज येथील घरी पोहोचले. त्यानंतर कानपूर, हाथरस, नोएडा आणि आंबेडकर नगरमध्येही त्यांच्या कारखाने आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. पुष्पराज जैन यांनी 2022 साठी 22 फुलांपासून बनवलेले समाजवादी परफ्यूम अलीकडेच लाँच केले होते. ते समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. पुष्पराज पंपी जैन यांच्याशिवाय कनौजमधील व्यावसायिक मोहम्मद याकूब मलिक यांचा भाऊ मोहसीन यांच्या निवासस्थानीही आयटी अधिकारी दाखल झाले होते. तेसुद्धा समाजवादी पार्टीतील वरिष्ठ नेत्यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय येथे छापे टाकण्यात आलेले बहुतांश व्यापारी गुटखा आणि परफ्युमच्या व्यवसायाशी संबंधित आहेत. दरम्यान, अत्तर व्यापाऱयांवर शुक्रवारी सकाळपासूनच कारवाई सुरू झाल्यानंतर सदर भागातील बऱयाच व्यावसायिकांनी आपली कार्यालये बंद ठेवली.
‘पी’ नामसाधर्म्यामुळे तपास यंत्रणांचा गोंधळ
मागील आठवडय़ात अत्तर व्यापारी पियूष जैनच्या 200 कोटींच्या मालमत्तेवर छापा टाकल्यानंतर राज्यात बऱयाच चर्चा सुरू होत्या. प्राप्तिकर अधिकाऱयांनी ‘पी’च्या प्रकरणामध्ये चुकून पियूष यांच्या घरावर छापा टाकल्याचे वारंवार बोलले जात होते. मात्र शुक्रवारी अखेर खऱया ‘पी’वर छापा टाकण्यात आला. टार्गेट ‘पी’ म्हणजे एमएलसी पुष्पराज जैन म्हणजेच ‘पंपी’ होते. पियूष जैन आणि पुष्पराज जैन यांच्यामध्ये नेहमीच नामसाधर्म्यामुळे गोंधळ उडत असल्याचे स्थानिक सांगतात. दोघांच्या नावांची आद्याक्षरे आणि आडनाव सारखेच असल्यामुळे तपास अधिकाऱयांचा गोंधळ उडाल्याचे दिसून आले होते.