नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नव्या वर्षासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्य नागरिकांना आनंदवार्ता दिली आहे. जीएसटी परिषदेत महत्त्वपूर्ण निर्णय घेत महागाईमध्ये होरपळणाऱया जनतेला किंचित दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कपडय़ांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय शुक्रवारच्या बैठकीत स्थगित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे कपडय़ांवरील जीएसटी 5 वरून 12 टक्के करण्याची अंमलबजावणी पुढील किमान दोन-तीन महिन्यांसाठी तरी लांबणीवर पडली आहे. मात्र, दुसरीकडे चप्पल आणि बुटांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नव्या वर्षात चप्पल आणि बुटांच्या किमती वाढणार आहे.
जीएसटी परिषदेची 46 वी बैठक शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. जीएसटीमध्ये 5, 12, 18 आणि 28 टक्के असे स्लॅब आहेत. सध्या 5 टक्के जीएसटी असलेल्या काही वस्तू 12 टक्क्मयांच्या स्लॅबमध्ये टाकण्यात येणार होत्या. मात्र यासंदर्भात अंतिम निर्णय घेताना कापडाचे दर वाढवण्यावर तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. यापूर्वी 17 सप्टेंबरला झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2022 पासून सुरू होणार होती.
सध्या कपडे खरेदीवर 5-12-18 टक्के जीएसटी
सद्यस्थितीत देशात मानवनिर्मित फायबरवर 18 टक्के जीएसटी दर आहे. तसेच एमएमएफ यार्नवर 12 टक्के आणि कपडय़ांवर 5 टक्के जीएसटी दर आहे. मात्र, सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या जीएसटी परिषद बैठकीत कपडे आणि चप्पल बुटांच्या जीएसटी दराच्या रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला होता.
राज्यांच्या विरोधामुळे जीएसटी परिषदेची माघार
कापडावरील जीएसटी 5 टक्के वरून 12 टक्के करण्याला अनेक राज्यांनी विरोध केला होता. विशेषतः तामिळनाडू, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांनी कपडे आणि चप्पल बुटांवर जीएसटी वाढीच्या निर्णयाला विरोध केला. यामुळे अखेर केंद्रीय अर्थमंत्र्यांना कपडय़ांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय फेब्रुवारी 2022 पर्यंत स्थगित करावा लागला. या प्रस्तावावर पुन्हा विचार करून परिषद नवीन प्रस्ताव आणणार आहे. काही वस्तूंवर लागू होणारे जीएसटी दर नव्याने लावले जाऊ शकतात.
फुटवेअरवरील जीएसटी दरवाढ कायम
जीएसटी परिषदेच्या बैठकीत इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि लक्झरी वस्तूंवरचा दर आणखी वाढणार का याकडे देखील लक्ष लागले होते. तथापि, तूर्तास कपडय़ाचे दर वाढवण्यास स्थगिती देण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी चप्पल आणि बुटांवरील जीएसटी दरवाढ कायम असल्यामुळे याचा परिणाम नव्या वर्षात चप्पल, बुटांच्या किमतीवर पाहायला मिळणार आहे. 1 जानेवारी 2022 पासून सर्व फुटवेअरवर 12 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दर सर्व किमतीच्या वस्तूंसाठी एकसमान म्हणजेच 12 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे.