भारताची भिस्त प्रामुख्याने सिंधु, सेन आणि श्रीकांतवर
वृत्तसंस्था/ बर्मिंगहम
बुधवारपासून येथे प्रतिष्ठेच्या अखिल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशीपला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत विविध देशांचे अव्वल बॅडमिंटनपटू सहभागी होणार आहेत. भारताची भिस्त प्रामुख्याने ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू, विश्व बॅडमिंटन स्पर्धेतील रौप्यपदक विजेता किदांबी श्रीकांत व सध्या फॉर्ममध्ये असलेल्या लक्ष्य सेन यांच्यावर राहील.
या स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि के. श्रीकांत यांना अद्याप विजेतेपद मिळविता आलेले नाही. दरम्यान 1980 साली विद्यमान प्रशिक्षक प्रकाश पडुकोन आणि 2001 साली पी. गोपीचंद यांनी या स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले होते. 2015 साली भारताच्या सायना नेहवालचे जेतेपद थोडक्यात हुकले. तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने आतापर्यंत ऑलिंपिक, विश्व बॅडमिंटन स्पर्धा, राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडास्पर्धेत पदके मिळविली आहेत. पण ती अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पदकापासून वंचित राहिली आहे. 20 वर्षीय लक्ष्य सेन या स्पर्धेत चमत्कार घडवेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत लक्ष्य सेनच्या कामगिरीत सातत्य दिसत आहे. त्याने गेल्या आठवडय़ात जर्मन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद तर इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपद आणि गेल्यावर्षी झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक मिळविले आहे.
बुधवारपासून सुरू होणाऱया या स्पर्धेत लक्ष्य सेनचा सलामीचा सामना भारताच्या सौरभ वर्माशी होणार आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या जर्मन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला दुसऱया फेरीत चीनच्या झेंग मानकडून पराभव पत्करावा लागला होता. सिंधूचा या स्पर्धेतील सलामीचा सामना चीनच्या 17 व्या मानांकित वेंग झी बरोबर होणार आहे. या स्पर्धेत सायना नेहवाल थायलंडच्या पी.चोचुवांगशी सलामीची लढत देणार आहे. पुरूष एकेरीत किदांबी श्रीकांतचा सलामीचा सामना थायलंडच्या के. वेंगचेरोनशी होणार आहे. पुरूष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज तसेच महिला दुहेरीत अश्विनी पोनाप्पा आणि एन. सिक्की रेड्डी भारताचे प्रतिनिधीत्व करतील.