कोरोना हद्दपार होत असताना प्रशासनाचा निर्णय
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना काळात शासकीय पातळीवर उपचारासाठी तत्काळ इमारत उपलब्ध होत नव्हती. तेव्हा संग्रहालयाची इमारतीत जम्बो कोरोना सेंटर उभारले गेले आणि जिल्हा रुग्णालयावरचा मोठा भार हलका झाला. आज कोरोना शून्याकडे जात असताना प्रशासनातर्फे जम्बोतील रुग्ण जिल्हा रुग्णालयात हलवून जम्बो सेंटर असणारी संग्रहालयाची इमारत सिल केली आहे. दरम्यान, ही इमारत संग्रहालयाची असल्यामुळे ती परत पुरातत्व विभागाकडे द्यावी, अशी मागणी शिवभक्तांकडून होत आहे.
जिल्हय़ात 23 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि जिल्हावासियांना धडकी भरली. एक वर एक असे कोरोना रुग्ण वाढू लागले तस तशी आरोग्य यंत्रणाही खडबडून जागी झाली. सापडलेले रुग्ण तसेच त्यांच्या संपर्कात असलेले नागरिक यांना ठेवण्यासाठी तालुकावार कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आली. पण कोरोनाचा वेग वाढत असल्यामुळे जम्बोची आवश्यकता भासू लागली होती. यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे जम्बो कोविड रुग्णालयात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची नवीन इमारतीत जम्बो सेंटर सुरू करण्यात आले.
सप्टेंबर 2020 मध्ये मोठय़ा प्रमाणावर कोरोनाची लाट वाढू लागली त्यामुळे रुग्णांना बेड मिळणे मुश्किल झाले. यावेळी जम्बोमधील बेडही कमी पडू लागले. त्यामुळे बेड मिळवण्यासाठी अक्षरशः कसरत करावी लागत होती. त्यामुळे जम्बो रुग्णालयाच्या व्यवस्थापनावरुन अनेक वाद झाले. इथे चाललेल्या अनेक गोष्टी मीडियाने समोर आणल्या. रुग्णांना दिलेली वागणूक, सिक्युरिटीसाठी वापरलेले बाऊंसर, व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा यामुळे नागरिक व व्यवस्थापनासोबत वाद झाले होते.
त्यानंतर पहिली लाट ओसरू लागली आणि पुन्हा मार्चमध्ये कोरोनाची दुसरी लाट वाढू लागली. पहिल्या लाटेपेक्षा भयावह असणाऱया दुसऱया लाटेतही जम्बो हॉस्पिटलमध्ये मोठय़ा प्रमाणावर रुग्णांची गर्दी वाढली होती. सध्य परिस्थितीत कोरोनाचा वेग चांगलाच मंदावला असून बाधितांचा आकडा 20-25 वर आला आहे. तसेच उपचारार्थ रुग्ण संख्याही 250 च्या दरम्यान आली आहे. त्यामुळे जम्बोमधील सर्व रुग्ण जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आणि जम्बो हॉस्पिटल सिल करण्यात आले आहे. त्याच्या मुख्य गेटलाही सिल ठोकण्यात आले आहे.
संग्रहालयाची इमारत परत करा
अपुऱया जागेतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय नवीन प्रशस्त इमारतीत जाणार होते. तत्पूर्वीच कोरोना आल्यामुळे ही इमारत जम्बो हॉस्पिटलसाठी देण्यात आली होती. आता कोरोना कमी झाल्यामुळे त्या इमारतीला सिल ठोकण्यात आले आहे. परंतु ती इमारत पुन्हा पुरातत्व विभागाकडे द्यावे, अशी मागणी शिवभक्त तसेच सातारकरांकडून अनेकवेळा केली आहे. याविषयी पुरातत्व विभागाने शासनाला तसा पत्रव्यवहारही केला आहे. परंतु या इमारतीचे हस्तांतरण अद्यापही झालेले नाही. त्यामुळे शिवभक्तांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.