मालवण न. प.च्या प्रायोगिक तत्वावरील उपक्रमाला यश : रॉक गार्डनच्या हौदातून गोAडे पाणी उपलब्ध
न. प., सिंधुदुर्ग पर्यावरण समवेतचा नीर क्षार प्रयोग
प्रयोगातील पाणी पिण्यायोग्य असल्याचा दाखला
प्रतिनिधी / मालवण:
खारे किंवा अशुद्ध पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याचा मालवण नगरपालिका व सिंधुदुर्ग पर्यावरण यांच्या प्रायोगिक तत्वावरील उपक्रमाला जानेवारी महिन्यात यश मिळाले होते. रॉक गार्डन येथे डिसेंबर महिन्यात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या उपक्रमातून जानेवारीमध्ये एक लीटर गोडे पाणी उपलब्ध झाले होते. आता प्रयोगातून उपलब्ध झालेले पाणी पिण्यास योग्य असल्याचा दाखला महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा सिंधुदुर्ग यांच्याकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे मालवण मामा वरेरकर नाटय़गृहात सुरू असलेल्या लसीकरणात सहभागी होणाऱया नागरिकांसाठी सदरचे पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
खाऱया पाण्यापासून गोडे पाणी असे म्हटले, तरी आपण अनेक प्रश्न उपस्थित करीत असतो. मात्र आता मालवणातील प्रयोगातून हे शक्य झाल्याने भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी हा प्रयोग यशस्वी ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. लसीकरणाच्या ठिकाणी सदरचे पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती मंदार केणी, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी कौतुक केले आहे. त्यामुळे पुढील काळात या उपक्रमातून जास्तीत जास्त गोडे पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे वैज्ञानिक डॉ. धनंजय केळकर यांनी सांगितले.
किनारपट्टीवरील गावात फायदा
समुद्र किनारपट्टीलगतच्या गावांमध्ये क्षारयुक्त मचुळ पाण्याची समस्या खूप गंभीर आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या भेडसावतात. परंतु रोज तहान भागविण्यासाठी आरोग्यदायी पाणी खरेदी करणे किंवा शुद्धिकरण उपकरणांचा वापर करून पाणी शुद्ध करून पिणाऱया नागरिकांची संख्याही किरकोळ आहे. मालवण पालिकेने क्षारयुक्त पाण्याची समस्या सोडविण्यासाठी खाऱया किंवा मचुळ पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याचा उपक्रम राबविण्याचे ठरविले. या उपक्रमासाठी मुंबई येथील वैज्ञानिक धनंजय केळकर, सिंधुदुर्ग पर्यावरण समवेतचे ओंकार केणी, अनाम प्रेम परिवार यांचे सहकार्य लाभले.
गोडे पाणी उपलब्ध
रॉक गार्डनच्या परिसरात प्रयोगासाठी आवश्यक असणारा हौद उभारण्यात आला होता. या हौदावर पारदर्शक कव्हर ठेवण्यात आले होते. खारे व मचुळ पाणी हौदात सोडण्यात आले होते. त्यानंतर सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने हौदातील पाणी गोडे होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर या हौदातून एक लीटर गोडे पाणी प्राप्त झाले होते. आता नियमितपणे सदरची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आता मोठय़ा प्रमाणात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत आहे.
कमी खर्चात गोडे पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न!
प्रायोगिक तत्वावरील उपक्रमास सहकार्य करणारे डॉ. धनंजय केळकर म्हणाले, मालवण रॉक गार्डन येथील राबविलेल्या प्रयोगातून गोडे पाणी उपलब्ध झाले आहे. आता गोडय़ा पाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. कारण कमीत कमी खर्चात आपल्याला गोडे पाणी उपलब्ध करून द्यायचे आहे. त्यामुळे एखाद्या कुटुंबाला कमीत कमी खर्चात गोडे पाणी उपलब्ध होईल.
पाण्यात जीवजंतू आढळले नाहीत – डॉ. केळकर
याबाबत डॉ. धनंजय केळकर म्हणाले, मालवण रॉक गार्डन येथील नीर क्षार प्रयोगात समुद्राच्या पाण्यापासून मिळवलेले पाणी पिण्यायोग्य असल्याचा दाखला महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा सिंधुदुर्ग यांच्याकडून मिळाला आहे. तीन महिन्यांनंतरही साठवलेल्या पाण्यात कुठलेच जीवजंतू आढळले नाहीत. क्षार तर मुंबईच्या पाण्यापेक्षा कमी आणि पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त आहे. टीडीएसचे प्रमाण 35 एवढे आहे. पुढील प्रयोगामध्ये पाण्याचे प्रमाण आठपट वाढले आहे.