सीबीआयने लावला शोध ; अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरण
प्रतिनिधी/ पणजी
वास्को येथे 2013 साली झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयिताची तब्बल नउढ वर्षांनी रेखाचित्र आणि बोटांच्या ठस्यांमुळे ओळख पटली असून, सीबीआय पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
संशयित मूळ मुर्शीबाद पश्चिम बंगाल येथील असून तो त्यावेळी गोव्यात राहत होता. वास्को येथील एका शाळेच्या शौचालयात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याने गोव्यातून पोबारा केला होता. तब्बल नऊ वर्षानंतर संशयिताची ओळख पटल्यानंतर सीबीआय पोलीस त्याला अटक करणार होते, मात्र तो फरार झाला असून सीबीआय पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
यापूर्वी गोवा पोलीस तसेच सीबीआयकडून या प्रकरणातील संशयिताची तीन रेखाचित्रे काढली होती. मात्र संशयिताची ओळख पटू शकली नव्हती. चार वर्षे तक्रारीचा तपास करूनही संशयिताचा शोध लागत नसल्याने 2017 साली सीबीआयने वास्को येथील प्रथम न्यायदंडाधिकाऱयांकडे तक्रार बंद करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र मुलीच्या पालंकांनी तक्रार बंद करण्यास विरोध दर्शविल्यानंतर न्यायालयाने त्या तक्रारीचा नव्याने तपास करण्यास सीबीआयला सांगितले होते.
दरम्यान, सीबीआय पोलिसांनी या तक्रारीचा नव्याने तपास करताना 14 जणांची डीएनए टेस्ट केली. तसेच 9 जणांचे बोटांचे ठसे घेऊन तपासणी केली होती. मात्र कोणताच सकारात्मक निकाल मिळला नव्हता. स्थानिक पोलिसांना या प्रकरणाचा तपास लागत नसल्याने चार महिन्यानंतर हे प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्यात आले होते, मात्र तपासकामात कोणतीच प्रगती झाल्याचे दिसून आले नाही. नंतर मे 2013 मध्ये काही बिगर सरकारी संस्थानी सदर तक्रार सीबीआयकडे देण्यात यावी म्हणून तत्कालीन सरकारकडे मागणी केली होती. सर्व सोपस्कर पूर्ण केल्यानंतर सप्टेंबर 2013 मध्ये गोवा सरकारने ही तक्रार सीबीआयकडे सोपविली होती. तब्बल चार वर्षे तपास केल्यानंतर सीबीआयने तयार केलेल्या तपास बंद अहवालात संशयिताचा शोध लागत नसल्याचे म्हटले होते.
वास्को येथील प्रथम न्यायदंडाधिकाऱयांनी तक्रार बंद करण्यास मान्यता न दिल्याने तक्रारीचे तपासकाम सुरुच होते. सीबीआय पोलिसांकडे असलेल्या रेखाचित्राच्या आधारे तसेच बोटांच्या ठस्यामुळे अखेर संशयिताचा शोध लागला आहे. संशयित सध्या फ्ढरार असून सीबीआय पोलीस त्याचा शोध घेत आहेत.