प्रतिनिधी/ नागठाणे
शिकारीच्या खोटय़ा गुह्यात अडकवण्याची धमकी देत पिरेवाडी (ता.सातारा) येथील युवकाकडून पंचवीस हजार रुपये उकळल्याप्रकरणी पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या चार वनकर्मचार्यांपैकी मुख्य सूत्रधार वनपाल योगेश पुनाजी गावित याला बोरगाव पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले.यापूर्वी वनसंरक्षक महेश सोनवले याला अटक केली असून तो पोलीस कोठडीत आहे.अजून दोन वनसंरक्षक पोलिसांना गुंगारा देत असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पिकांचे संरक्षण करण्यासाठी गेलेल्या पिरेवाडी येथील ओंकार शामराव शिंदे या युवकाला वनविभागाच्या चार कर्मचायांनी शिकारीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पंचवीस हजार रुपये उकळले होते.ही घटना 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली होती.याची तक्रार ओंकार शिंदे याने 5 सप्टेंबरला बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती.पोलिसांनी वनपाल योगेश पुनाजी गावित,वनसंरक्षक महेश साहेबराव सोनवले,रणजित व्यंकटराव काकडे, किशोर ज्ञानदेव ढाणे या चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.गुन्हा दाखल झाल्यापासून हे चौघेही पोलिसांना गुंगारा देत होते.
यापैकी वनसंरक्षक महेश सोनवले याला पोलिसांनी बुधवार 22 ऑक्टोबर रोजी अटक केली होती.सध्या तो पोलीस कोठडीत आहे.सोमवारी सायंकाळी पोलिसांनी या गुह्यातील प्रमुख वनपाल योगेश गावित याला ताब्यात घेतले.या खंडणीप्रकरणातील अन्य दोन वनसंरक्षक रणजित व्यंकटराव काकडे व किशोर ज्ञानदेव ढाणे हे पोलिसांना गुंगारा देत असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.या घटनेचा पुढील तपास सपोनि डॉ.सागर वाघ करत आहेत.
वनसंरक्षक सोनवलेच्या कास्टडीत वाढ
खंडणीप्रकरणातील वनसंरक्षक महेश साहेबराव सोनवले याला दि.22 ऑक्टोबर रोजी अटक केली होती.त्याला जिल्हा न्यायालयाने 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.यावेळी न्यायालयाने त्याला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.